राष्ट्रीय पिछडा वर्गाच्या भारत बंदला पाठिंबा
अहमदनगर (प्रतिनिधी)- राष्ट्रीय पिछडा वर्गच्या वतीने मंगळवारी (दि.29 नोव्हेंबर) पुकारण्यात आलेल्या भारत बंदला पाठिंबा देऊन भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने जुने बस स्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. केंद्रातील भाजपच्या सरकारच्या विरोधात यावेळी जोरदार निदर्शने करण्यात आली.
या आंदोलनात बहुजन मुक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष शिवाजी भोसले, डॉ. भास्कर रणनवरे, संजय कांबळे, अण्णा गायकवाड, एल.बी. जाधव, सुरेश शिंदे, गणपत मोरे, मिलिंद आंग्रे, शांताराम शिंदे, रामदास धीवर, एकनाथ गायकवाड आदी सहभागी झाले होते.
राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष विकास पटेल चौधरी यांच्या नेतृत्वाखाली भारतभर झालेल्या या आंदोलनात राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा, भारत मुक्ती मोर्चाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सक्रीय सहभाग नोंदवला. यावेळी पर्यावरण संरक्षणाच्या नावाखाली आदिवासींना जल, जंगल व जमीन यापासून विस्थापित करणे व टाळेबंदीत कामगारांच्या विरोधात बनवलेल्या श्रमिक कायद्याला विरोध दर्शविण्यात आला.
केंद्र सरकारद्वारे इतर मागासवर्ग ओबीसीची जातिनिहाय जनगणना करावी, ईव्हीएम मशीन बंद करून सर्व निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्या, खाजगी क्षेत्रामध्ये एस.सी., एस.टी. ओबीसींना आरक्षण लागू करावे, शेतकर्यांसाठी हमी भाव देणारा एमएसपी गॅरंटी कायदा लागू व्हावा, जुनी पेन्शन योजना लागू करावी, नवीन कामगार विरोधी कायदे मागे घ्यावे, एससी, एसटी, ओबीसी मधील विद्यार्थ्यांसाठी महागाईचा विचार करुन वाढीव शिष्यवृत्ती लागू करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
