• Thu. Oct 16th, 2025

भारतीय लोकशाही पार्टीची स्थापना

ByMirror

Feb 13, 2023

विविध सामाजिक संघटनेत कार्यरत असलेले पदाधिकारी राजकारणात एकवटले

ऐतिहासिक अहमदनगर शहरातून नव्या राजकीय पर्वाचा उदय -रावसाहेब काळे

अहमदनगर (प्रतिनिधी)- ऐतिहासिक अहमदनगर शहरातून नव्या राजकीय पर्वाचा उदय होत असून, सर्वांना न्याय, हक्क मिळवून देण्याबरोबर समाजात समानता, एकता, बंधुता टिकविण्यासाठी भारतीय लोकशाही पार्टीची स्थापना झाली असल्याचे प्रतिपादन भारतीय लोकशाही पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष रावसाहेब काळे यांनी केले.


विविध सामाजिक संघटनेत कार्यरत असलेल्या पदाधिकार्‍यांनी एकवटून नव्याने भारतीय लोकशाही पार्टीची स्थापना केली. पक्षाच्या पहिली बैठक शासकीय विश्रामगृह येथे पार पडली. यावेळी पक्षाची भूमिका स्पष्ट करताना काळे बोलत होते. याप्रसंगी पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष पोपट बनकर, राष्ट्रीय सचिव सुभाष अल्हाट, राष्ट्रीय कार्याध्यक्ष विजय पाथरे, राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य ईसाबाई शेख, पार्टीचे कायदेशीर सल्लागार अ‍ॅड. महेश शिंदे, सागर आलचेट्टी, उत्तम पवार, बाबू काकडे, अनंत द्रवीड, अण्णासाहेब पाटोळे, विनोद साळवे, बाळासाहेब नेटके, ज्योती पाटोळे, आशा गायकवाड, शाहीर कान्हू सुंबे, विजय भालसिंग, किसन शिरोडकर, संजय घोडके, अनिल बर्डे, नवनाथ वाघ, प्रा. गोरख अंबरीत, अशोक कासार, राम कराळे, माणिक वाघ, गौरव पांढरकर, सिद्धांत पाटोळे, गणेश झिरपे आदी उपस्थित होते.


पुढे काळे म्हणाले की, दिवसेंदिवस वाढत चाललेली अराजकता, गरीब कुटुंब आणखी गरीब तर श्रीमंत व्यक्ती आणखी श्रीमंत होताना दिसून येतो. ही विषमता दूर करण्यासाठी, शेतकर्‍यांसाठी ठोस उपाययोजना प्रत्यक्ष राबविण्यासाठी, माजी सैनिकांच्या समस्या सोडविण्यासाठी, भ्रष्टाचाराची पाळेमुळे उघडून फेकण्यासाठी, मुठभर लोकांची मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी, भांडवलदार वर्ग आर्थिकतेच्या जोरावर करीत असलेल्या राजकीय हस्तक्षेप तसेच घराणेशाहीचा नायनाट करण्यासाठी, सहकार क्षेत्रातील गुलामगिरी दडपशाही मोडीत काढण्यासाठी, पदवीधरांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी, जुनी पेन्शन योजना पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी, घरेलू कामगार, कंपनीतील कामगारांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी, खाजगी बँका, फायनान्स कंपन्यांची सावकारी मोडीत काढण्यासाठी आदी ज्वलंत प्रश्‍नांवर भारतीय लोकशाही पार्टी काम करणार असल्याचे काळे यांनी सांगितले. तर लवकरच अहमदनगर जिल्ह्याची कार्यकारणी जाहीर केली जाणार असल्याचेही ते म्हणाले.


राष्ट्रीय उपाध्यक्ष पोपट बनकर म्हणाले की, राजकारणात आर्थिक स्थिती, नातेवाईक, भक्तगिरी जोपासताना दिसून येते. विचारसरणीत जनविकास लोकनेते या लोकशाही तत्त्वांना सुरुंग लावून, जातीपातीचे धर्म, वंश, आर्थिक अमिषे घराणेशाहीचा वापर करून निवडणुका जिंकण्याचे षडयंत्र सुरू आहे. यातून विकासाऐवजी गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत असून, स्थानिक समस्या देखील सोडविल्या जात नाही. अंमलबजावणी करणार्‍या शासकीय यंत्रणा देखील हात मिळवणी करून प्रस्थापितांना सहकार्य करत आहे. भारतीय लोकशाही पार्टीची स्थापना जनविचारातून पुढे आलेली सर्वसामान्यांची इच्छा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


राष्ट्रीय सचिव सुभाष अल्हाट यांनी आगामी होणार्‍या जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, विधानसभा, लोकसभा अशा प्रत्येक ठिकाणी सर्वसामान्य कुटुंबातील प्रभावी नेतृत्व असलेला उमेदवार उभा करुन क्रांतीपर्वाची सुरुवात करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या बैठकीचे सूत्रसंचालन विजय पाथरे यांनी केले. आभार सागर आलचेट्टी यांनी मानले. यावेळी पुणे, बीड, औरंगाबाद, नाशिक, नंदुरबार, जळगाव, नगर या जिल्ह्यातील पक्षात काम करण्यास इच्छुक असणारे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *