अहमदनगर जिल्हा तालीम संघा व्यतिरिक्त इतर संघटनांना अधिकृत कुस्ती स्पर्धा घेण्याची मान्यता नाही -संजयकुमार सिंग
अहमदनगर (प्रतिनिधी)- भारतीय कुस्ती महासंघाचे उपाध्यक्ष संजयकुमार सिंग यांनी अहमदनगर जिल्हा तालिम संघाच्या कार्यालयास भेट दिली. यावेळी अहमदनगर जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदचे उपाध्यक्ष पै. वैभव लांडगे यांनी संजयकुमार यांचे स्वागत करुन सत्कार केला.
लांडगे यांनी जिल्ह्यात सुरु असलेल्या कुस्ती क्षेत्रातील कार्याचा आढावा सादर करुन घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांची माहिती दिली. यावेळी नगर शहर तालिम संघाचे अध्यक्ष नामदेव लंगोटे, नगर तालुका तालिम संघाचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे, पारनेर तालुका तालिम संघाचे अध्यक्ष पै. युवराज पठारे, कर्जत तालुका तालिम संघाचे अध्यक्ष विजूकाका तोरडमल, शेवगाव तालुका तालिम संघाचे अध्यक्ष विक्रम बारवकर, नेवासा तालुका तालिम संघाचे अध्यक्ष प्रताप चिंधे, अकोले तालुका तालिम संघाचे अध्यक्ष सोमेश्वर (बबलू) धुमाल, दिपक डावखर, पाथर्डी तालुका तालिम संघाचे अध्यक्ष प्रमोद भांडकर, श्रीगोंदा तालुका तालिम संघाचे अध्यक्ष संदीप बारगजे, संगमनेर तालुका तालिम संघाचे भागवत ठोंबरे, पै. पप्पू शिरसाठ, विलास चव्हाण, सुनील भिंगारे, मोहन हिरणवाळे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

संजयकुमार सिंग म्हणाले की, अहमदनगर जिल्ह्याला कुस्ती क्षेत्राचा मोठा वारसा असून, हा वारसा जपण्याचे काम अहमदनगर जिल्हा तालिम संघाने केले आहे. अहमदनगर जिल्हा तालिम संघाचे कार्य महाराष्ट्रात आघाडीवर असून, जिल्ह्यात आजपर्यंत विविध कुस्ती स्पर्धा व मैदानी कुस्त्या यशस्वी पार पडल्या असल्याचे स्पष्ट करुन त्यांनी तालिम संघाच्या कार्याचे कौतुक केले. तर अहमदनगर जिल्हा तालीम संघ हा महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद व भारतीय कुस्ती महासंघाला संलग्न आहे. अहमदनगर जिल्हा तालीम संघाला अधिकृतपणे राष्ट्रीय, राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय तसेच महाराष्ट्र केसरी व हिंद केसरी सारख्या कुस्ती स्पर्धा घेण्याचा अधिकार आहे. अहमदनगर जिल्हा तालीम संघा व्यतिरिक्त इतर संघटनांना या स्पर्धा घेण्याची मान्यता नसल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
पै. वैभव लांडगे यांनी कुस्ती खेळाला चालना देण्यासाठी राजकारण बाजूला ठेऊन खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे कार्य सुरु आहे. अहमदनगर जिल्हा तालिम संघाने महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने अनेक स्पर्धा घेतल्या आहेत. जिल्ह्यातील अनेक कुस्ती मल्ल राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर आपले कर्तृत्व गाजवीत असल्याचे त्यांनी सांगितले.
