ज्यांच्यामुळे जगण्याचा अधिकार मिळाला, मनुष्य म्हणून सन्मान मिळाला त्या महामानवाची ही जयंती -आ. संग्राम जगताप
अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त मार्केटयार्ड चौकातील त्यांच्या पुतळ्यास राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, उपमहापौर गणेश भोसले, नगरसेवक प्रकाश भागानगरे, राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे सुरेश बनसोडे, व्यापार व उद्योग सेलचे अनंत गारदे, भिंगार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजय सपकाळ, वकिल सेलचे अॅड. योगेश नेमाणे, सुमित कुलकर्णी, अशोक गायकवाड, सरचिटणीस मारुती पवार, गणेश बोरुडे, विनोद साळवे, शौर्यराज पाटील, साधना बोरुडे, लहू कराळे, संजय कांबळे, संजय खामकर आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
आमदार संग्राम जगताप म्हणाले की, शहरवासीयांसाठी आनंदाचा क्षण असलेला आंबेडकर जयंती दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्ण कृती पुतळ्याच्या आराखड्याचे संकल्प चित्र अनावरण होत आहे. आंबेडकरी चळवळीचे स्वप्न असलेल्या पूर्ण कृती पुतळ्याच्या पायाभरणीसाठी लवकरच कामाचे भूमिपूजन देखील होणार आहे. ज्यांच्यामुळे जगण्याचा अधिकार मिळाला, मनुष्य म्हणून सन्मान मिळाला त्या महामानवाची ही जयंती आहे. दूरदृष्टी ठेवून महामानव बाबासाहेबांनी घटनेत नमूद केलेल्या कलमांचा आजही दिशादर्शकपणे उपयोग होत आहे. आपत्कालीन परिस्थितीमध्ये कोणत्या कलमाचा वापर केंव्हा व कसा करावा? याचे देखील घटनेत समावेश असल्याने कोरोनाच्या महामारीत सर्वांना दिशा मिळाली. अनेक प्रसंगामध्ये घटनेचा उपयोग होवून आधार मिळतो. वेळोवेळी दिशादर्शक कामासाठी या महामानवाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. जगाच्या पाठीवर बाबासाहेबांच्या विचारांना मानणारा मोठा वर्ग असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रा. माणिक विधाते म्हणाले की, संपूर्ण जगात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली जाते. त्यांचे जीवन चरित्र अभ्यासले जात असून, परदेशातील विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात त्यांचे धडे शिकवले जातात. त्यांनी समाजाला समता, स्वातंत्र्य व बंधुत्वाची दिलेली शिकवण प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.