मैदानी खेळाने जिद्द व आत्मविश्वास निर्माण होते -आयुक्त डॉ. पंकज जावळे
अहमदनगर (प्रतिनिधी)- भैरवनाथ एज्युकेशन सोसायटी संचलित भाग्योदय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या क्रीडा मेळाव्याचे उद्घाटन मनपा आयुक्त डॉ. पंकज जावळे यांच्या हस्ते झाले. भैरवनाथ एज्युकेशन सोसायटीचे सचिव रघुनाथ लोंढे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी ओअॅसिस इंग्लिश मिडीयम स्कूलच्या वैशाली कोतकर, भाग्योदय विद्यालयाचे प्राचार्य ज्ञानदेव बेरड, सुधाकर सुंबे, खंडेराव दिघे आदी उपस्थित होते.
आयुक्त डॉ. पंकज जावळे म्हणाले की, मोबाईलमुळे विद्यार्थी व युवक मैदानी खेळापासून दुरावले गेले आहे. मैदानी खेळाने जिद्द व आत्मविश्वास निर्माण होत असते. तर स्वत:मधील क्षमता देखील ओळखता येते. भीवा पिढीला सर्वात मोठा धोका मोबाईलचा आहे. दिवस-रात्र मुले मोबाईलमध्ये गुंतली जात आहे. निरोगी व सदृढ आरोग्यासाठी मैदानी खेळ महत्त्वाचा असून, सक्षम पिढी घडविण्यासाठी मैदानी खेळ आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
प्राचार्य ज्ञानदेव बेरड म्हणाले की, शिक्षणाबरोबर शारीरिक स्वास्थ्यासाठी मैदानी खेळ तेवढेच महत्त्वाचे आहे. शाळेत शिक्षणांबरोबर कला-क्रीडा गुणांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. खेळाडूवृत्तीने विद्यार्थ्यांमध्ये धाडस व आत्मविश्वास निर्माण होतो. मानसिक व शारीरिक आरोग्य चांगले राहण्यासाठी मैदानी खेळ जीवनाचा अविभाज्य घटक बनविण्याचे विद्यार्थ्यांना त्यांनी सांगितले.
पाहुण्यांच्या हस्ते आकाशात फुगे सोडून क्रीडा स्पर्धेचे प्रारंभ करण्यात आले. यावेळी खो-खो,100 व 200 मीटर धावणे, गोळा फेक, लांब उडी, उंच उडी, स्लो सायकल, संगीत खुर्ची आदी विविध मैदानी स्पर्धा रंगल्या होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय गोसावी यांनी केले. आभार धनंजय बारगळ यांनी मानले. यावेळी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
