• Sat. Mar 15th, 2025

भाकपचे भाजप हटाव… देश बचाव! या जनजागरण मोहीमेचा प्रारंभ

ByMirror

Apr 14, 2023

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करुन छत्रपती चौथे शिवाजी महाराज स्मारक येथून अभियानाची सुरुवात

भाजप सरकारने कुणाचे आणि कोणते अच्छे दिन आनले? प्रश्‍न विचारण्याची वेळ -अ‍ॅड. कॉ. सुभाष लांडे

अहमदनगर (प्रतिनिधी)- भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त भाजप हटाव… देश बचाव! या जनजागरण मोहीमेचा प्रारंभ करण्यात आला. शुक्रवारी (दि.14 एप्रिल) सकाळी मार्केटयार्ड चौकातील बाबासाहेबांच्या पुतळ्यास पक्षाच्या वतीने अभिवादन करुन, शहरातील छत्रपती चौथे शिवाजी महाराज स्मारक येथे या अभियानाची सुरुवात करण्यात आली.


या जनजागरण मोहीमेत सहभागी झालेल्यांनी भाजप हटाव… देश बचावच्या जोरदार घोषणा दिल्या. यावेळी भाकपचे राज्यसचिव अ‍ॅड.कॉ. सुभाष लांडे, राज्य सचिव मंडळ सदस्या कॉ. स्मिता पानसरे, जिल्हा सचिव कॉ. बन्सी सातपुते, ज्येष्ठ नेते कॉ. बाबा आरगडे, निवृत्ती दातीर, जिल्हा सहसचिव अ‍ॅड. कॉ. सुधीर टोकेकर, जिल्हा सहसचिव संतोष खोडदे, लक्ष्मण नवले, बहिरनाथ वाकळे, भारती न्यालपेल्ली, सतीश पवार, विजय भोसले, संजय कांबळे, सुभाष शिंदे, फिरोज शेख, कन्हैय्या बुंदेले, अनिल फसले, कमलाबाई दोंता, लक्ष्मी कोटा, संगीता कोंडा, सगुना श्रीमल, शोभा बिमन, चंद्रकांत माळी, नरेश पासकंठी आदींसह पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


अ‍ॅड. कॉ. सुभाष लांडे म्हणाले की, मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने कुणाचे आणि कोणते अच्छे दिन आनले? हे जनतेने अंधभक्तांना विचारायला हवे. अच्छे दिनाचे गाजर दाखवून त्यांच्याच शब्दात जुमलेबाजी करून सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने मतदारांचा विश्‍वासघात केला असून भारतातील नागरिकांची घोर फसवणूक केली आहे काही ठराविक कार्पोरेट घराण्याला अच्छे दिन आणि बाकी जनतेला वाईटातले वाईट दिवस आणून पश्‍चात्तापाची वेळ आणली असल्याचे त्यांनी सांगितले. तर धर्मनिरपेक्ष लोकशाहीवादी सरकार सत्तेवर आणण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने भाजप हटाव देश बचाव मोहीम हाती घेतली असल्याचे स्पष्ट केले.


बन्सी सातपुते म्हणाले की, शेतकरी व कामगार वर्गाचे प्रश्‍न गंभीर बनले आहेत. सर्वसामान्य जनतेने जीवनमरणाचे प्रश्‍न उपस्थित करु नये, म्हणून जाती-धर्माच्या नावाखाली फुट पाडून दंगे भडकावण्याचे कारस्थान सध्या सुरू आहे. शेती उत्पादन खर्चा दिवसंदिवस वाढत असताना शेतीमालाला योग्य बाजारभाव देण्यास सरकार तयार नाही. यामुळे शेतकरी वर्गा देशोधडीस लावण्याचे काम भाजप करीत असल्याचा त्यांनी आरोप केला.


कॉ. स्मिता पानसरे म्हणाल्या की, जय भीम फक्त जय जयकार नसून, व्यवस्थेला जाब विचारण्याचा व अन्याया विरोधात पेटून उठण्याचा नारा आहे. ज्या महामानवाने देशाला घटना दिली व प्रगल्भ लोकशाही राष्ट्र जगासमोर आले. सध्या भाजपच्या हुकूमशाही धोरणाने लोकशाही धोक्यात आली आहे. विधवांना काय म्हणावे?, अपंगांना काय म्हणावे? यापेक्षा त्यांचे प्रश्‍न सुटणे महत्त्वाचे आहे. भाजप सरकार फसव्या योजना व भूलथापांना सर्वसामान्यांना झुलवीत ठेवत आहे. या मोहीमेद्वारे भाजपचा खरा चेहरा जनतेसमोर आणण्याचे काम केले जाणार आहे, असे त्या म्हणाल्या. यावेळी उपस्थितांनी आपल्या भाषणात भाजपच्या शेतकरी, कामगार व जनहित विरोधातील धोरणावर टिका केली. तर जनतेने व सर्व लोकशाहीवादी धर्मनिरपेक्ष शक्तींनी या मोहिमेला पाठिंबा देऊन या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन भाकपच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *