अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाची मागणी
वेतन पथक अधीक्षकांना निवेदन
अहमदनगर (प्रतिनिधी)- शिक्षण उपसंचालकांच्या बैठकीत झालेल्या निर्णयाप्रमाणे जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षक, शिक्षकेतरांचे पगार राष्ट्रीयकृत बँकेत महिन्याच्या एक तारखेला करण्याची मागणी अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन वेतन पथक अधीक्षक रामदास म्हस्के यांना देण्यात आले. यावेळी माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष आप्पासाहेब शिंदे, सचिव राजेंद्र खेडकर, एम.एस. लगड, एच.ए. नलगे, वैभव सांगळे, जे.बी. मेटकर, बी.एस. डोंगरे, भरत गोल्हार, सोन्याबापू गांधले, विशाल पाळंदी, माणिक पवार आदी उपस्थित होते.
अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटनेच्या वतीने माध्यमिक शिक्षक, शिक्षकेतरांचे पगार राष्ट्रीयकृत बँकेत महिन्याच्या एक तारखेला करण्याची मागणी शिक्षण उपसंचालक पुणे यांच्यासह शिक्षक आमदार किशोर दराडे व आमदार सत्यजित तांबे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेल्या सहविचार सभेत करण्यात आली होती. शिक्षण विभागाच्या संबंधित अधिकार्यांनी या बैठकीत ही मागणी मान्य केली होती. त्या सभेत प्रोसिडिंगवर हा विषय घेऊन महिन्याचे शिक्षक, शिक्षकेतरांचे पगार राष्ट्रीयकृत बँकेत होतील व ते 1 तारखेलाच होतील असे सांगण्यात आले. परंतु महिना संपत आला असताना देखील मागील महिन्याचे काही शाळांचे पगार अद्याप झालेले नाही. 20 टक्के, 40 टक्के अनुदानित शाळांचे पगार तर दोन महिन्यापासून झालेले नाहीत. याबाबत तातडीने निर्णय घेण्याचे निवेदनात म्हंटले आहे.
तर यावेळी थकित मेडिकल बिले, फरक बिले व सातवा वेतन आयोगाचा फरक मिळण्याची मागणी देखील करण्यात आली. वेतन पथक अधीक्षक म्हस्के यांनी शिक्षक, शिक्षकेतरांचे वेतन महिन्याच्या 1 तारखेला करण्याचे आश्वासन दिले. तर राष्ट्रीयकृत बँकेत पगार जमा करण्यास असमर्थता दर्शवून, मेडिकल बिले व फरक बिलांचा प्रश्न देखील लवकरात लवकर मार्गी लावण्याचे स्पष्ट केले. यापुढे शिक्षक, शिक्षकेतरांचे वेतन 1 तारखेला राष्ट्रीयकृत बँकेत न झाल्यास संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.