• Fri. Mar 14th, 2025

बेकायदेशीरपणे आंदोलन करणार्‍या महावितरणच्या त्या कर्मचारींवर कारवाई व्हावी

ByMirror

Jun 2, 2023

सह्याद्री छावा संघटनेची मागणी

अन्यथा 14 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालय समोर आंदोलन

अहमदनगर (प्रतिनिधी)- बेकायदेशीरपणे आंदोलन व कर्तव्यात कसूर करुन सेवा वर्तणुकीबाह्य कृत्य करणार्‍या महावितरणच्या कर्मचार्‍यांवर कारवाई करावी व या कर्मचार्‍यांना पाठिशी घालणार्‍या अधिकार्‍यांची खातेनिहाय चौकशी करण्याची मागणी सह्याद्री छावा संघटनेच्या वतीने प्रदेशाध्यक्ष रावसाहेब काळे यांनी जिल्हाधिकारी व महावितरणचे अधीक्षक अभियंता यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.


महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम 1979 चे उल्लंघन करुन महावितरण कंपनीच्या कर्मचार्‍यांनी बेकायदेशीरपणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात 9 नोव्हेंबर रोजी आंदोलन केले. हे कृत्य सेवा वर्तणुकी बाह्य असून, कर्मचार्‍यांना अधीक्षक अभियंता यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेले आहे. यांच्याविरुद्ध कोणतीही कायदेशीर कारवाई करण्यात आलेली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.


वीज तांत्रिक कामगार सहकारी पतसंस्थेने महाराष्ट्र शासन सहकार आयुक्त व सहकारी संस्था महाराष्ट्र पुणे निबंधक यांच्या आदेशान्वये बर्‍याच सभासदांचे सभासदत्व रद्द केलेले आहे. सभासद रद्द झालेल्यांनी वास्तविक पाहता हा न्याय जिल्हा उपनिबंधक कार्यालय, सहकार आयुक्त व सहकारी संस्था महाराष्ट्र पुणे निबंधक यांच्याकडे न्यायिक मार्गाने दाद मागणे गरजेचे होते. परंतु त्यांना या संस्थेतील अन्य सभासदांनी आंदोलन करण्यास भाग पाडले. कर्मचार्‍यांनी आंदोलनात सहभागी होण्यासाठी कार्यालयास दांडी मारली अथवा खोटे कारण सांगून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आंदोलनात सहभाग घेऊन गर्दी केली. ज्यांचे सदस्यत्व रद्द झालेले नाही अशा देखील कर्मचारींनी सहभाग नोंदवून अन्य सहकार्यांना भडकवून निदर्शने करून आंदोलन घडून आणल्याचे निवेदनात म्हंटले आहे.


अशा कर्मचार्‍यांनी आपल्या कर्तव्यात कसूर केलेले आहे. यांच्याविरुद्ध कर्मचारी वर्तणूक नियमानुसार कारवाई करण्यात यावी, या कृत्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणार्‍या महावितरणच्या अधीक्षक अभियंता यांची देखील खातेनिहाय चौकशी करण्याची मागणी सह्याद्री छावा संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. अन्यथा 14 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *