मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतरांना शिक्षण विभागासंबंधी प्रश्न सोडविण्यासाठी सहभागी होण्याचे आवाहन
शिक्षण उपसंचालकांसह शिक्षणाधिकारी राहणार हजर
अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतरांचे प्रश्न सोडविण्यासाठी शहरात शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी बुधवारी (दि.22 फेब्रुवारी) शिक्षक दरबाराचे आयोजन केले आहे. यामध्ये शिक्षक, शिक्षकेतरांचे प्रश्न तात्काळ मार्गी लावण्यासाठी शिक्षण उपसंचालक, माध्यमिक व प्राथमिकचे शिक्षणाधिकारी आणि शिक्षण विभागाचे सर्व कर्मचारी उपस्थित राहणार असल्याची माहिती आमदार दराडे यांचे स्विय सहाय्यक हरीश मुंढे यांनी दिली आहे.

रेसिडेन्शियल विद्यालयात दुपारी 1 वाजता होणार्या शिक्षक दरबाराच्या माध्यमातून शिक्षण विभागाशी संबंधित असलेले सर्व प्रश्न व अडचणी सोडविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर बंधु-भगिनींनी व्यक्तिगत अथवा सामूहिक समस्यांसह शालार्थ आयडी, फरक बिले, वैयक्तिक मान्यता व डीएड टू बीएड मान्यता, निवड श्रेणी, वरिष्ठ वेतन श्रेणी, विनाअनुदानित-अनुदानित शिक्षकांच्या समस्या व शिक्षण विभागाशी निगडित विविध प्रश्न सोडविण्यासाठी या शिक्षक दरबारात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आपल्या प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह शिक्षकांना येण्याचे सांगण्यात आले आहे. तसेच शिक्षकांच्या न्याय, हक्काच्या प्रश्नावर वेळोवेळी पाठपुरावा करणार्या मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर संघटनांच्या प्रतिनिधींना देखील यावेळी उपस्थित राहण्याचे सांगण्यात आले आहे.