दीपावली सणानिमित्त एक रकमी ठेव परत
रिबेट म्हणून साखर वाटप
अहमदनगर (प्रतिनिधी)- बिरोबा दूध संकलन केंद्राकडून दूध उत्पादक शेतकर्यांना दीपावली सणानिमित्त एक रकमी ठेव परत करून, रिबेट म्हणून साखर वाटप करण्यात आली. कार्यक्रमाच्या ठिकाणी सर्व दूध उत्पादकांचा फेटा बांधून सन्मान करण्यात आला. वर्षभर केलेल्या दूध पुरवठ्या मधून प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक काढून त्यांचा शाल, फेटा, स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्रक देऊन गौरव करण्यात आला.
ह.भ.प. महंत दत्तगिरीजी महाराज यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विक्रमराव तांबे, पत्रकार राजेंद्र वाडेकर, चंद्रगिरी दूध संकलन व शीतकरण केंद्राचे चेअरमन नानासाहेब जुंधारे, दैवत दूध संघाचे चेअरमन केशवराव शिंदे, भैरवनाथ दूध संकलन व शीतकरण केंद्राचे चेअरमन पियुष (आबा) शिंदे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवीभाऊ मोरे, तुळजा माता दूध संकलन केंद्राचे चेअरमन अशोकराव आंधळे, ढाकणे वस्ती दूध संकलन केंद्राचे चेअरमन बाबासाहेब ढाकणे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रभाकर गाडे आदी उपस्थित होते.
घोरपडवाडी (ता. राहुरी) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत हा कार्यक्रम संपन्न झाला. प्रमुख पाहुण्यांचा सन्मान बाबुराव शेंडगे, हरिभाऊ हापसे, आप्पासाहेब बाचकर, रभाजी शेंडगे, भारत लांडगे, बाबुराव बाचकर, बुवाजी शेंडगे, गणेश तमनर व नारायणराव तमनर यांच्या वतीने करण्यात आला. प्रथम क्रमांकाच्या पुरस्काराचे मानकरी रावसाहेब मारुती शेंडगे ठरले. तर द्वितीय क्रमांक राजू जानकू देवकाते व तृतीय क्रमांक पोपटराव बाबुराव तमनर यांना मिळाला. यांचा बिरोबा दूध संकलन केंद्राचे स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात आला.

प्रास्ताविकात नारायणराव तमनर म्हणाले की, दूध संकलन केंद्राची स्थापना चार वर्षापूर्वी झाली असून, तीन वर्षापासून असा उपक्रम अविरत सुरू आहे. वर्षभरातून एकदा तरी दूध उत्पादकांचा सन्मान होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. तर दूध पुरवठा करताना निर्भेळ दूध व गुणवत्तापूर्वक दूध सर्वांनी संकलन केंद्रासाठी पुरविण्याचे आवाहन करुन त्यांनी दूध संकलन केंद्राचा पारदर्शक व्यवहार, उच्चतम दर, वेळेवर पेमेंट, आर्थिक अडचणीला होणारी मदत याबरोबरच अनेक वैशिष्टये विशद केली.

ह.भ.प. महंत दत्तगिरी महाराज म्हणाले की, दूध संकलन केंद्रातील उत्पादकांचा झालेला सन्मान व रिबेट म्हणून केलेले साखरेचे वाटप हा उपक्रम कौतुकास्पद आहे. इतर दूध संकलन केंद्रातील व्यवस्थापकांनीही यांचा आदर्श घ्यावा असे सांगून, नारायणराव तमनर यांचे सामाजिक काम नेहमी इतरांच्या तुलनेत वेगळे राहिले असल्याचे त्यांनी नमूद केले.
राजेंद्र वाडेकर म्हणाले की, संस्थेचा कारभार पारदर्शक असून, नारायणराव तमनर यांचे काम नेहमी आदर्शवत राहिले आहे. संस्थेला त्यांच्या अनुभवाचा नक्की फायदा होईल. इतरांपेक्षा त्यांचे काम नेहमी दिशादर्शक राहिले असल्याचे त्यांनी सांगितले. नानाभाऊ जुंधारे यांनी सामाजिक क्षेत्रात नारायणराव तमनर यांचे सातत्याने योगदान सुरु आहे. पाटबंधारे पतसंस्थेत चेअरमन म्हणून काम करताना त्यांनी आपल्या कार्याचा आदर्शवत ठसा उमटविला असून, सहकार क्षेत्रात त्यांचे असलेले ज्ञान दिशादर्शक राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भैरवनाथ दूध संकलन व शीतकरण केंद्राचे चेअरमन पियुष आबा शिंदे म्हणाले की, बिरोबा दूध संकलनाचा दूध दर नेहमी सर्वांपेक्षा उच्चतम राहिला आहे. दूध उत्पादकांना हक्काचे माप नेहमी पदरात टाकण्याचा प्रयत्न यांनी केला असल्याचे सांगितले. तर नवीन संकरित गाईंचे वाण तयार करण्यासंदर्भात माहिती दिली.
दैवत दूध संघाचे चेअरमन केशवराव शिंदे यांनी शेती व्यवसायात नैसर्गिक संकटाचा सामना करुन पिकाला योग्य भाव न मिळाल्यास मोठे नुकसान होते. दूधाला चांगला भाव मिळाल्यास शेतकर्यांना मोठा आधार मिळतो. या उपक्रमाने शेतकर्यांना चांगला आधार मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले. विक्रमराव तांबे म्हणाले की, तमनर बंधू यांचे पारदर्शक व्यवहार असून, सामाजिक क्षेत्रात योगदान देऊन त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली असल्याचे स्पष्ट करुन दूध उत्पादक शेतकर्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
रवीभाऊ मोरे यांनी ओला दुष्काळामुळे दूध धंदा एकमेव व्यवसाय शेतकर्यांकडे उरला आहे. उसाचे कारखाने देखील शेतकर्यांना हक्काचे दर देत नाहीत, कांद्याचे दर, सोयाबीनचे दर यासाठी नेहमी संघर्ष करावा लागत आहे. दूध धंदा एकमेव उदरनिर्वाहाचा भाग झाल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमावेळी उत्पादक भानुदास झावरे, नानाभाऊ बाचकर, संतोष गाडे, बाळू येळे, शांताराम येळे, सोपान येळे, बबनराव शिंदे, शिवाजी थोरात, अजित थोरात, राहुल गाडे, गोरख गाडे, सर्जेराव जाधव, बाळासाहेब तमनर, सचिन गाडे, गोपी शेंडगे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नारायणराव तमनर यांनी केले. आभार नानासाहेब करमड यांनी मानले.