कोरोनाने मयत झालेल्या कर्मचाऱ्यांना 50 लाख मदत व अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्याची मागणी
दप्तर दिरंगाई करुन याप्रकरणी चालढकल सुरु असल्याचा आरोप
अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोना काळात काम करीत असताना कोरोनाची लागण होऊन मयत झालेल्या कामगारांच्या वारसांना 50 लाख रुपये नुकसान भरपाई व अनुकंपा तत्त्वावर नोकरीत सामावून घेण्याच्या मागणीसाठी लाल निशाण पक्षाच्या वतीने शहराच्या मार्केटयार्ड येथील महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या कार्यालया समोर मयतांच्या कुटुंबीयांसह आमरण उपोषण करण्यात आले.
या उपोषणात संघटनेचे सचिव कॉ. अनंत लोखंडे, मध्यवर्ती संघटनेचे सदस्य कॉ. आनंदराव वायकर, शहराध्यक्ष कॉ. पंकज लोखंडे, जिल्हा सहचिटणीस कॉ. राजू वैराळ, कॉ. विनायक गोरखे, मयत व्यक्तीचे कुटुंबीय, रंजना पवार, सागर पवार, भीमराज आजबे, सचिन आजबे, रूपाली जाधव, आदित्य जाधव, संघटनेचे लक्ष्मण बोरुडे, निवृत्ती घोडके, संतोष शेलार, प्रल्हाद भास्कर, दत्ता घोरपडे, अशोक बनसोडे, बाळासाहेब पाटोळे, ऋषिकेश दिघे, अरविंद वाघमारे आदी सहभागी झाले होते.
मार्केटयार्ड येथील छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन उपोषणाची सुरुवात करण्यात आली. कोरोनात मयत झालेल्या कुटुंबीयांची उपासमारी सुरु असताना, संबंधित विभागाकडून केली जात असलेल्या दप्तर दिरंगाईच्या निषेधार्थ यावेळी जोरदार घोषणा देण्यात आल्या.
महाबीज प्रक्रिया केंद्र खंडाळा (ता. श्रीरामपूर) येथे कोरोना काळात काम करीत असताना आप्पासाहेब संभाजी पवार, भरत बाजीराव जाधव, आशाबाई भीमराज आजबे हे कर्मचारी कोरोनाने बाधित होऊन त्यांचा उपचारादरम्यान निधन झाले होते. संबंधितांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबातील वारसांना महाबीज कडून 50 लाख रुपये नुकसान भरपाई व अनुकंपा तत्त्वावर नोकरीत सामावून घेण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आलेला आहे. मात्र अद्यापही कार्यालयाकडून कोणत्याही प्रकारे सदर मागण्यांची पूर्तता करण्यात आलेली नाही. घरातील कर्ता व्यक्ती गेल्याने सदर कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली असून, संबंधितांचे पुनर्वसन करण्यासाठी चालढकल सुरु असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी आदेश देऊनही महाबीज प्रक्रिया केंद्राने मयत व्यक्तींच्या कुटुंबीयांना मदत मिळण्यासाठी कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही. तातडीने सदर मागणी पूर्ण न झाल्यास उपोषणा सुरु ठेवण्याचा पवित्रा लाल निशाण पक्ष व मयतांच्या कुटुंबीयांनी घेतला आहे.