ज्ञानसाधना गुरुकुलचा उपक्रम
टाळ-मृदूंगाच्या निनादात जय हरी विठ्ठल, ज्ञानोबा-तुकोबांचा जयघोष
अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील ज्ञानसाधना गुरुकुल क्लासची आषाढी एकादशीनिमित्त काढण्यात आलेली बाल वारकर्यांची दिंडी उत्साहात पार पडली. या दिंडीत विद्यार्थी श्री विठ्ठल-रुक्मिणी व विविध संत व वारकर्यांच्या वेशभूषेत सहभागी झाले होते.

पांढरी टोपी, कपाळी गंध, पायजमा, बंडी या पोशाखातील लहान मुले, तर रंगीबेरेंगी साड्या परिधान करुन मुली डोक्यावर तुलसी वृंदावन घेऊन दिंडीत सहभागी झाल्या होत्या. ज्ञानोबा… तुकाराम… च्या जयघोषाने परिसर निनादला. केडगावपासून ते प्रतिपंढरपूर समजले जाणार अरणगाव येथील विठ्ठलाचे मंदिर मार्गे दिंडी काढण्यात आली होती. या दिंडीचे केडगाव देवी मंदिरासमोर जगदंबा तरुण मंडळ, शिवमुद्रा ग्रुप व परिसरातील नागरिकांनी स्वागत करुन मुलांना फराळाचे वाटप केले. दिंडी अरणगाव येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पोहचल्यावर गावचे उपसरपंच सागर कल्हापुरे व ग्रामस्थांच्या वतीने छोट्या वारकर्यांचे उत्साहात स्वागत झाले. यावेळी ग्रामस्थांनी मुलांना मसाला दूध व खिचडीचे वाटप केले.
उद्योजक जालिंदर कोतकर म्हणाले की, वारकरी संप्रदायाची असलेली परंपरा जोपसण्याचे काम ज्ञानसाधना गुरुकुल करत आहे. बाल वारकर्यांची दिंडी पाहून पंढरपूरला आल्याचा भास निर्माण होत असल्याचे सांगून, या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले.
भैरू कोतकर म्हणाले की, विद्यार्थ्यांमध्ये दिंडीच्या माध्यमातून आपली संस्कृती जोपसण्याचे कार्य होत आहे. अशीच परंपरा कायम चालत राहण्यासाठी त्यांनी गुरुकुलच्या सर्व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या. ज्ञानसाधना गुरुकुलचे संचालक प्रसाद जमदाडे म्हणाले की, या दिंडीच्या माध्यमातून चिमुकल्यांनी विठ्ठल चरणी सर्वाना सुखी समाधानी ठेव, जगाचा पोशिंदा शेतकरीला चांगले दिवस येवो, चांगला पाऊस पडो, सुख-समृध्दी नांदण्यासाठी साकडे घालण्यात आले.
या कार्यक्रमासाठी बच्चन कोतकर, अजित कोतकर, संभाजी पवार, मुख्याध्यापक संदीप भोर, नवनाथ कोतकर, नितीन ठुबे, राहुल चिपाडे, अमित ढोरसकर, भाऊ चेमटे, रणजित ठुबे, अमोल कोतकर, शिक्षक शाहरुख शेख, रुचिता जमदाडे, शबाना शेख, निशिगंधा गायकवाड, सुप्रिया मुळे, कल्याणी शिंदे, पूजा जाधव, संचालक प्रा. प्रसाद जमदाडे आदींसह विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.