विविध वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी वेधले लक्ष
प्रगती फाऊंडेशन व बटरफ्लाय नर्सरीचा उपक्रम
अहमदनगर (प्रतिनिधी)- प्रगती फाऊंडेशनच्या माध्यमातून बटरफ्लाय नर्सरीच्या विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशी निमित्त बालिकाश्रम रोड परिसरातून दिंडी काढली. विठ्ठल-रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, मीराबाई, मुक्ताबाई व संत तुकारामांच्या वेशभूषा परिधान केलेल्या चिमुकल्यांनी सर्वांचे लक्ष वेधले.

मुलांच्या हातात असलेल्या टाळ-मृदूंगचा निनाद, मुलींच्या डोक्यावर तुलशी वृंदावन, जय हरी विठ्ठल, ज्ञानोबा-तुकोबांचा जयघोष करीत निघालेल्या दिंडीत उत्साह संचारला होता. महावीरनगर येथून या दिंडीची सुरुवात झाली.
डोक्यावर पांढरी टोपी, कपाळी गंध, पायजमा, बंडी या पोशाखातील लहान मुले, तर रंगीबेरेंगी साड्या परिधान करुन मुलीं दिंडीत सहभागी झाल्या होत्या. विणेकरी, चोपदार व दिंडी प्रमुखांच्या भूमिका बालकांनी पार पाडल्या. बालिकाश्रम रोड परिसरात या दिंडीचे संचलन होऊन गणपती मंदिराच्या परिसरात दिंडीची सांगता झाली.

प्रगती फाऊंडेशनच्या अध्यक्षा अश्विनी वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हा दिंडी सोहळा पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांसह पालक देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी मुलांना आपल्या संस्कृतीची माहिती होणे आवश्यक आहे. याच भावनेतून या दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याचे वाघ यांनी म्हंटले.