• Mon. Dec 1st, 2025

प्लास्टिक मुक्तीचा संदेश देत भुईकोट किल्ला व चांदबिबी महाल परिसरात स्वच्छता

ByMirror

Jun 12, 2023

टाटा पॉवर कम्युनिटी डेव्हलपमेंट ट्रस्टचा उपक्रम

मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिकचा कचरा गोळा

वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- पर्यावरणाला घातक ठरत असलेल्या व देशापुढे मोठी समस्या असलेल्या प्लास्टिक कचर्याचा वापर टाळण्याच्या दृष्टीकोनाने प्लास्टिक मुक्तीचा संदेश देत टाटा पॉवर कम्युनिटी डेव्हलपमेंट ट्रस्टच्या वतीने ऐतिहासिक भुईकोट किल्ला व चांदबिबी महाल परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.


प्लास्टिकच्या वापरामुळे सजीव सृष्टीसह जैवविविधतेवर होत असलेल्या दुष्परिणामाची जागृती करण्यासाठी टाटा समूहातर्फे सुरु असलेल्या टाटा सस्टेनअबिलिटी मंथ जून 2023 उपक्रमातंर्गत हे अभियान राबविण्यात आले. यामध्ये टाटा पॉवर कम्युनिटी डेव्हलपमेंट ट्रस्टचे विश्‍वास सोनवले, टाटा पॉवरचे अधिकारी प्रवीण वाघ, सागर उशीर, थानेश, अक्षय परब, बॉस्को ग्रामीण विकास केंद्राचे संचालक फादर जॉर्ज दाब्रिओ, संदिप बेरड, अर्जुन शरणागते, प्रहासचे डॉ. प्रवीण गायकवाड, पॉवरकॉनचे दिनेश माळी, हरियाली संस्थेचे अध्यक्ष सुरेश खामकर, ठाकूरदास परदेशी, अमोल बास्कर, स्वयंम बास्कर, राम पाखरे आदींसह बचत गटाच्या महिला, युवक, पर्यावरण प्रेमी, कर्मचारी वर्ग व नागरीक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


प्रारंभी अमोल बास्कर यांनी उपस्थितांना शहराच्या इतिहासाची सखोल माहिती देऊन, भुईकोट किल्ला व चांदबिबी महालचे ऐतिहासिक महत्त्व विशद केले. तर निजामशाही ते ब्रिटीश राजवट व स्वातंत्र्याच्या लढ्यात शहराच्या इतिहासाशी जोडलेल गेलेल्या महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटनांचा उलगडा केला.
भल्या पहाटे स्वच्छता अभियानात सर्व स्वयंसेवक व युवक भुईकोट किल्ल्यात हजर झाले होते.

हातात झाडू, पोते, खुरपे घेऊन घनदाट झाडींनी व्यापलेल्या ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यात असलेल्या प्लास्टिकचा कचरा स्वच्छ केला़. त्यानंतर चांदबिबी महाल येथे जाऊन स्वच्छता करण्यात आली. यामध्ये प्लॅस्टिकच्या रिकाम्या पाणी बॉटल, स्ट्रॉ, कॅरीबॅग्स, सोडा, शीतपेयाच्या बाटल्या, प्लॅस्टिकच्या थाळ्या, कप, अन्नाचे डबे आदी प्लॅस्टिक कचर्‍याचा मोठ्या प्रमाणात समावेश होता. या अभियानाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिकचा कचरा गोळा करुन ऐतिहासिक स्थळ स्वच्छ करण्यात आले.


प्लास्टिक प्रदूषण ही खूप मोठी समस्या आहे. प्लास्टिकचा वापर बंद करणे ही एक मोठी समस्या असताना दुसरीकडे प्लास्टिक कचर्‍याला सामोरे जाण्याचे आव्हानही भयंकर स्वरूप धारण करत आहे. नागरिकांमध्ये जागृती आणण्याच्या उद्देशाने टाटा समुहाने सुरु केलेल्या टाटा शास्वत मास 2023 ची माहिती विश्‍वास सोनवले यांनी दिली.


फादर जॉर्ज यांनी गोळा केलेल्या कचर्‍यातून निसर्ग पूरक वस्तू पुन्हा निर्मितीकरीता कार्य करीत असलेल्या संस्थेस सुपूर्द केले जाणार असल्याचे स्पष्ट केले. या अभियानात बॉस्को ग्रामीण विकास केंद्र, हरियाली संस्था, पॉवरकॉन, बचत गटाच्या महिलांनी सहभाग नोंदवला. सुरेश खामकर यांनी प्लॅस्टिक कचर्याचे दुष्परिणाम सांगून स्वयंसेवकांना प्लॅस्टिक न वापरण्याची शपथ दिली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *