सन्मानाने वीर माता-पत्नी भारावल्या
वीर जवानांच्या कुटुंबीयांचे प्रश्न सुटण्यासाठी मंत्रालयावर मोर्चा काढणार -विनोदसिंग परदेशी
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील प्रहार सैनिक कल्याण संघटनेच्या वतीने संभाजीनगर रोडवरील प्रहार करिअर अकॅडमीत वीर माता-पत्नी आणि त्यांच्या कुटुंबियांचा गौरव करण्यात आला. देशासाठी बलिदान देणार्यांप्रती कृतज्ञता ठेऊन हा सन्मान सोहळा राबविण्यात आला होता. या सन्मानाने वीर माता-पत्नी अक्षरश: भारावल्या.
या कार्यक्रमात नाशिक, जळगाव, धुळे, चाळीसगाव जिल्ह्यातील वीर माता-पत्नी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य सहभागी झाले होते. वीर सैनिकांचे कुटुंबीय शिर्डी आणि शनिशिंगणापूर येथे देवदर्शनासाठी आले होते. कर्जतला जाताना प्रहार करिअर अकॅडमीमध्ये प्रहार सैनिक कल्याण संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष विनोदसिंग परदेशी यांनी वीर माता, पिता आणि पत्नींचा सन्मान केला.
या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय सचिव बाळकृष्ण मोहिते, नगर जिल्हाध्यक्ष रावसाहेब भोर, जिल्हा क्यूआरटी अध्यक्ष राहुल पाटोळे, मीडिया प्रमुख पोपट कापसे, कार्याध्यक्ष गोरख पालवे, दीपक गायकवाड, विजय कातोरे, रेखाताई खैरनार, सुवर्णाताई शिंदे, हर्षदाताई खैरनार, सारिकाताई मोरे आदी उपस्थित होते.
या सन्मानामुळे वीर माता पती-पत्नीचे कुटुंबीय अत्यंत भाऊक झाले, तर काहींचे डोळे पाणावले.
फुलांचा वर्षाव करीत त्यांना सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. वीर जवानांच्या कुटुंबीयांचे अनेक प्रश्न आहेत, मात्र सरकार दरबारी ते मार्गी लागत नसल्याने भविष्यकाळात प्रहार सैनिक कल्याण संघटनेतर्फे वीर, माता, पत्नी आणि पित्यांना घेऊन मंत्रालयावर मोर्चा काढणार असल्याचे विनोदसिंग परदेशी यांनी सांगितले.