दिव्यांगांना आधार देऊन त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी संघटनेचे कार्य -अॅड. लक्ष्मण पोकळे
अहमदनगर (प्रतिनिधी)- प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने जिल्हा रुग्णालयात अपंग प्रमाणपत्र काढण्यासाठी येणार्या दिव्यांगबांधवांच्या सोयीसाठी व्हीलचेअरची भेट देण्यात आली. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय घोगरे यांच्याकडे व्हीलचेअर सुपुर्द करण्यात आली.
यावेळी प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष अॅड. लक्ष्मण पोकळे, शहराध्यक्ष संदेश रपारिया, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीकांत पाठक, डॉ. महावीर कटारिया, डॉ. मनोज घुगे, डॉ. संदीप कोकरे, छाया जाधव, श्रीगोंदा तालुकाध्यक्ष राजेंद्र पोकळे, नगर तालुकाध्यक्ष किशोर सूर्यवंशी, संदीप खामकर, पांडुरंग वाडगे, हमीद शेख, पोपट शेळके आदी उपस्थित होते.
अॅड. लक्ष्मण पोकळे म्हणाले की, अहमदनगर जिल्हा रुग्णालयात दर बुधवारी जिल्हा भरातून दिव्यांग बांधव येत असतात. या दिव्यांगांना सोय उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम घेण्यात आला असून, दिव्यांगांना आधार देऊन त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी संघटनेचे कार्य सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय घोगरे यांनी प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेने सामाजिक भावनेने घेतलेला उपक्रम कौतुकास्पद आहे. रुग्णालयाच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींना नेहमीच सहकार्य व मदत राहणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
