कॉ. पानसरे यांच्या हत्येला आठ वर्षे उलटून देखील आरोपींना शिक्षा होत नसल्याचा संताप व्यक्त
लोकशाहीचा गळा दाबून सत्ताधार्यांच्या हुकूमशाहीने अराजकतेकडे वाटचाल -कॉ. स्मिता पानसरे
अहमदनगर (प्रतिनिधी)- कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येला आठ वर्षे उलटून देखील आरोपींना अद्यापि शिक्षा झाली नसल्याच्या निषेधार्थ पानसरे यांच्या स्मृतीदिनी सोमवारी (दि.20 फेब्रुवारी) डावे व समविचारी पक्ष आणि संघटनांच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर एल्गार-जवाब दो मोर्चा काढण्यात आला.
पत्रकार चौकातील शहीद भगतसिंह यांच्या पुतळ्यास स्वातंत्र्य सैनिक कॉ. पांडुरंग शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन मोर्चाची सुरुवात करण्यात आली. या आंदोलनात भाकपचे जिल्हा सेक्रेटरी कॉ. अॅड. बन्सी सातपुते, कॉ. स्मिता पानसरे, काँग्रेसचे किरण काळे, ज्ञानदेव पांडुळे, कॉ. बाबा आरगडे, बहिरनाथ वाकळे, हॉकर्स युनियनचे संजय झिंजे, कॉ. अॅड. सुधीर टोकेकर, मनोज गुंदेचा, अर्शद शेख, संजय खामकर, शिवाजी साळवे, अन्सार सय्यद, कॉ. कारभारी उगले, कडू पाटील, सुलाबाई आदमाने, कॉ. संजय नांगरे, संध्या मेढे, युनूस तांबटकर, भारती न्यालपेल्ली, सगुना श्रीमल, कमल दोंता, शारदा बोगा, लक्ष्मी कोटा, भाग्यश्री आडम, शोभा बिमन, कोंडाजी उगले, अमोल उगले, सतीश उगले, निवृत्ती दातीर, संतोष खोडदे, अनिस चुडीवाला, शंकर आव्हाड, उषा भगत, प्रविण गिते, हाफिज शेख, भाकपचे फिरोज शेख, अरुण थिटे, संतोष गायकवाड, रामदास वागस्कर, नंदू उमाप, अल्तमश जरीवाला, आम आदमी पार्टीचे भरत खाकाळ, रवी सातपुते, दिलीप घुले, राजेंद्र कर्डिले, राष्ट्र सेवा दलाचे शिवाजी नाईकवाडी, बापू जोशी, सावलीचे नितेश बनसोडे, अॅड. हरिश्चंद्र लोंढे, धनंजय देशमुख, हमाल पंचायतचे गोविंद सांगळे, मधुकर केकान, संजय महापुरे, राहुल घोडेस्वार, बहिरु कोतकर, नारायण गिते, मेहेरबाबा कामगार युनियनचे कॉ. सतीश पवार आदी सहभागी झाले होते.

आंदोलकांनी लाल झेंडे व कॉ. गोविंद पानसरे यांची प्रतिमा जवाब दो! चे फलक हातात घेऊन जोरदार घोषणा दिल्या. तारकपूर मार्गे मोर्चा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडकला. यावेळी कॉ. पानसरे यांचे मारेकरी व प्रमुख सुत्रधारांना पाठिशी घालणार्या केंद्र व राज्य सरकार विरोधात जोरदार निदर्शने केली. तर मोर्चाचे द्वार सभेत रुपांतर होऊन पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात ठिय्या देऊन प्रमुख वक्त्यांची भाषणे झाली. आंदोलकांनी कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्यार्यांना त्वरित जेरबंद करून त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी महाराष्ट्र शासनाचे गृह खाते, त्यांच्या तपासयंत्रणांना कार्यक्षमतेने कामाला लावून न्यायालयास योग्य ते पुरावे सादर करण्याची एकमुखी मागणी केली.
पूरोगामी विचाराचे कृतिशील विचारवंत कॉ. गोविंद पानसरे यांच्यावर कोल्हापूर येथे त्यांच्या घराजवळ दि.16 फेब्रुवारी 2015 रोजी गोळीबार करण्यात आला. यामध्ये ते जखमी होऊन 20 फेब्रुवारी 2015 रोजी उपचारादम्यान त्यांचे निधन झाले. या घटनेला आता आठ वर्षे होत आहेत; मात्र त्यांची हत्या करणार्यांना अद्याप शिक्षा झालेली नाही. आजपर्यंत तपास विशेष तपास पथकाकडे (एस.आय.टी.) होता आणि आता तो दहशवाद विरोधी पथकाकडे (ए.टी.एस.) सोपविण्यात आला आहे. आता एटीएसचे अधिकारी तपास हाती घेताच न्यायालयातच म्हणतात फरार आरोपींना शोधणे कठीण आहे. म्हणजे अशा टोलवा-टोलवी मध्ये आणखी किती वर्षे लागणार? हा प्रश्न डावे पक्ष व संघटनांच्या वतीने उपस्थित करुन जवाब दो आंदोलन करण्यात आले.

कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास सांगितला, मंडल आयोगाच्या समर्थनार्थ प्रचार मोहिम केली, आरक्षणाच्या बाजुने कायम भूमिका घेतली, राजर्षि शाहु महाराजांचा वसा आणि वारसा कथन केला आणि एटीएसचे अधिकारी हेमंत करकरे यांच्या मारेकर्यांविषयी आपीएस अधिकारी एस.एम. मुश्रीफ यांनी लिहिलेले व्हू किल्ड करकरे या पुस्तकावर 100 व्याख्याने आयोजनाचा संकल्प केला. या सर्व प्रकारामुळे धर्मांध, सनातनी विकृत्तींच्या पित्त खवळले आणि त्यांनी कॉ. पानसरेंची हत्या केली. या पूर्वी महाराष्ट्रात नरेंद्र दाभोळकर, कर्नाटकात गौरी लंकेश, कलबुर्गी या पुरोगामी प्रबोधनकारांनाही असेच संपविण्यात आले. लोकशाहीचा गळा दाबून सत्ताधार्यांच्या हुकूमशाहीने अराजकतेकडे वाटचाल सुरु असल्याचे कॉ. स्मिता पानसरे म्हणाल्या.
पुरोगामी महाराष्ट्रात उपेक्षित समूहाची बाजू घेऊन सनातनी धर्मांधतेविरोधात संघर्ष करणार्या पानसरे-दाभोळकर यांची हत्या होऊन देखील त्यांचे मारेकरी व प्रमुख सुत्रधार मोकाट फिरत आहे. लोकशाहीवादी-धर्मनिरपेक्ष जनता म्हणून याचा जाब विचारण्यासाठी हे आंदोलन करण्यात आल्याची भूमिका मांडून मागण्यांचे निवेदन अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांना देण्यात आले.
