मैदानावर रंगला क्रीडा स्पर्धेचा थरार
आकाशात फुगे व कबुतर सोडून क्रीडा मेळाव्याचे उद्घाटन
अहमदनगर (प्रतिनिधी)- क्रीडा ज्योतचे बॅण्ड पथकासह विद्यार्थ्यांचे शिस्तबध्द संचलन, तर मैदानात रंगलेल्या विविध क्रीडा स्पर्धेच्या थरारने मुकुंदनगर येथील पी.ए. इनामदार स्कूलचा वार्षिक क्रीडा मेळावा उत्साहात पार पडला.

मौलाना शफिक कासमी यांच्या हस्ते क्रीडा ध्वजचे अनावरण करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी संस्थेचे चेअरमन अब्दुल रहिम खोकर, व्हाईस चेअरमन इंजि. इकबाल सय्यद, राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाचे शहर उपाध्यक्ष अब्दुल रऊफ खोकर, प्राचार्य हारुन खान, उपप्राचार्या फरहाना शेख, पालक शिक्षक संघाचे पदाधिकारी, सदस्य, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविकात क्रीडा शिक्षक रामेश्वर हारके यांनी शाळेच्या खेळाडूंनी जिल्हा व विभाग स्तरावर मिळवलेल्या यशाचा आलेख मांडला. पाहुण्यांचे स्वागत फरहाना शेख यांनी केले.
प्राचार्य हारुन खान म्हणाले की, क्रीडा स्पर्धेने मुलांचा सर्वांगीण विकास साधला जातो. शिक्षणाबरोबर शारीरिक स्वास्थ्यासाठी मैदानी खेळ तेवढेच महत्त्वाचे आहे. शाळेत शिक्षणांबरोबर कला-क्रीडा गुणांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. खेळाडूवृत्तीने विद्यार्थ्यांमध्ये धाडस व आत्मविश्वास निर्माण होतो. मानसिक व शारीरिक आरोग्य चांगले राहण्यासाठी मैदानी खेळ जीवनाचा अविभाज्य घटक बनविण्याचे त्यांनी आवाहन केले.
मौलाना शफिक कासमी म्हणाले की, इस्लाम धर्मात शिक्षणाबरोबर खेळाला देखील महत्त्व देण्यात आलेले आहे. समाजातील मुला-मुलींनी मैदानी खेळ खेळले पाहिजे. स्पर्धेतून आपल्यातील क्षमता ओळखा येतात. निरोगी शरीर ही ईश्वराची देण असून, त्याची काळजी घेतली गेली पाहिजे. बौद्धिक कौशल्याला शरीराची साथ मिळाल्यास यश मिळवता येते. शारीरिक स्वास्थ्यासाठी मैदानी खेळ सर्वोत्तम असल्याचे त्यांनी सांगितले. सचिव विकार काझी व खजिनदार डॉ. खालिद शेख यांनी क्रीडा स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते आकाशात फुगे व कबुतर सोडून मैदानी क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनानंतर विविध क्रीडा स्पर्धेचा थरार शालेय मैदानात रंगला होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरोज नायर व सुमय्या शेख यांनी केले. आभार मुनज्जा शेख यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी क्रीड शिक्षक हारके, अमित बडदे आदींसह सर्व शालेय शिक्षक व शिक्षकेतरांनी परिश्रम घेतले.
