गुंडेगावच्या पारधी वस्तीत क्रायने घेतला शिक्षण व संरक्षणावर जनजागृती मेळावा
पारधी समाजाला शिक्षणाशिवाय पर्याय नाही -जयवंत ओहोळ
अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील गुंडेगाव येथे झालेल्या पारधी समाजातील जातपंचायतमध्ये शिक्षण व संरक्षण बाबत जनजागृती मेळावा पार पडला. जातपंचायतीत पारधी समाजाला शिक्षणाचे महत्त्व विशद करुन, मुला-मुलींचे प्रश्न व संरक्षणावर मार्गदर्शन करुन त्यांच्या उज्वल भवितव्यासाठी शिक्षणाच्या प्रवाहात येण्याचे आवाहन करण्यात आले.
क्राय (मुंबई) या संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या या जनजागृती मेळाव्यासाठी अहमदनगर व पुणे जिल्ह्यातील पारधी समाजातील कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. बालकल्याण समितीचे अध्यक्ष जयवंत ओहोळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या मेळाव्यासाठी कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष तथा क्रायचे कन्सल्टंट राजेंद्र (राजस्थान) काळे, नगर तालुका गट शिक्षणाधिकारी बाबुराव जाधव, बाल न्याय मंडळाच्या सदस्या अॅड. ममता नंदनवार, जिल्हा बाल संरक्षण कक्ष अधिकारी अॅड. अशोक अळकुटे, केंद्रप्रमुख दिलीप दहिफळे, प्रकाश कदम, नंदा साळवे, मंदा कांबळे, सुवर्णा धावडे, आरती भोसले, अजित भोसले, कोमल शिंगाडे, स्वाती नेटके, कन्सल्टंट स्वाती कुदांडे, हसीना पठाण, चंद्रकांत काळे आदींसह पारधी समाज व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रास्ताविकात राजेंद्र (राजस्थान) काळे म्हणाले की, सामाजिक परिवर्तनाची नांदी ठरण्यासाठी जातपंचायतीमध्येच जनजागृती मेळावा घेण्यात आला आहे. समाजाला परिवर्तनाची दिशा देण्याचे काम शिक्षणाच्या माध्यमातून सुरू आहे. तसेच शासनाला बरोबर घेऊन समाजातील प्रश्न सोडविण्यासाठी संस्थेच्या माध्यमातून कार्य सुरु असून, बालविवाह, बालमजुरी नष्ट होण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. या मेळाव्यात पारधी समाजातील हुंडाबळी, महिला पुरुष भेदभाव, अशिक्षित आदी प्रश्नावर जातपंचायतीचे पंच मंडळींनी ठराव सहमत करण्याचे ठरविले.

गटशिक्षणाधिकारी बाबुराव जाधव म्हणाले की, पारधी समाजातील मुले मोठ्या प्रमाणात शाळाबाह्य आहे. त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. हा घटक शिक्षणाच्या प्रवाहात आल्यास परिवर्तन घडणार आहे. तर या घटकातील शालाबाह्य मुले शाळेत आणून त्यांना टिकवण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
अॅड. ममता नंदनवार म्हणाल्य की, पारधी समाजातील शिक्षणाबरोबर मुली व महिलांच्या प्रश्न गंभीर आहेत. ते सोडविण्यासाठी देखील त्यांच्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. हे प्रश्न त्यांच्यात जाऊन सुटणार आहे. या उद्देशाने त्यांच्या जातपंचायतमध्ये हा मेळावा घेऊन महिला व विशेषत: मुलींना भविष्याच्या दृष्टीने मार्गदर्शन करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
बालकल्याण समितीचे अध्यक्ष जयवंत ओहोळ म्हणाले की, पारधी समाजाला शिक्षणाशिवाय पर्याय नाही. हा समाज शिक्षणाच्या प्रवाहात आल्यास त्यांचा विकास साधला जाणार आहे. समाज सुशिक्षित झाल्यास यामधील अनिष्ट प्रथा, रूढी, परंपरा दूर होणार आहेत. समाजातील मुलांप्रमाणे मुलींना देखील शिक्षणाचा हक्क मिळण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.