कमी वेळेत जास्तीत जास्त शरीराला व्यायाम देणारा मल्लखांब एकमेव क्रीडा प्रकार -पै.नाना डोंगरे
अहमदनगर (प्रतिनिधी)- दिवाळी पाडव्यानिमित्त शहरातील दादा चौधरी विद्यालयात रोप व पोल मल्लखांबची विधीवत पूजा करण्यात आली. जिल्हा तालिम संघाचे खजिनदार पै.नाना डोंगरे यांच्या हस्ते ही पूजा पार पडली. यावेळी मल्लखांब प्रशिक्षक गणेश वाळुंजकर, मल्लखांब संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजकुमार धोत्रे, हरियाली संस्थेचे अध्यक्ष सुरेश खामकर, सार्थ वाळुंजकर आदी उपस्थित होते.
पै.नाना डोंगरे म्हणाले की, कुस्तीला पुरक असलेला हा व्यायामप्रकार सध्या दुर्मिळ होत आहे. कमी वेळेत जास्तीत जास्त शरीराला व्यायाम देणारा जगातील एकमेव क्रीडा प्रकार म्हणून मल्लखांबची ओळख आहे. मोबाईलच्या युगात अडकलेली युवा पिढी मैदानी खेळाकडे दुर्लक्ष करीत असल्याने, आरोग्याचे अनेक प्रश्न जटील बनत चालले आहे. कसदार व पिळदार शरीरयष्टीसाठी मल्लखांब मुलांसह मुलींना देखील उपयुक्त असून, मल्लखांबाला मोठा इतिहास असल्याचे त्यांनी सांगितले
.
प्रशिक्षक गणेश वाळुंजकर यांनी मल्लखांब खेळाचा इतिहास अतिशय प्राचीन असून, सन 1135 मध्ये लिहिलेल्या मानसोल्लास या ग्रंथात मल्लखांब खेळाचे वर्णन आढळते. ओडिशा राज्यातील जगन्नाथपुरीच्या प्राचीन मंदिराजवळ पंधराव्या शतकात सुरु झालेल्या जगन्नाथ वल्लभ आखाड्यात मल्लखांब प्रशिक्षण वंशपरंपरेने सुरु आहे. महाराष्ट्रात पेशवे कालावधीनंतर या खेळाची नोंद मोठ्याप्रमाणात आढळत असल्याची माहिती त्यांनी दिली. मल्लखांब शिकण्याचे त्यांनी युवक-युवतींना आवाहन केले.