• Wed. Oct 15th, 2025

पाचोरा येथील पत्रकारावर झालेल्या हल्ल्याचा निषेध

ByMirror

Aug 11, 2023

पत्रकारास धमकावून त्याच्यावर हल्ला घडविणाऱ्या त्या आमदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

जिल्हाधिकारी यांना निवेदन

अहमदनगर (प्रतिनिधी)- पाचोरा (जि. जळगाव) येथील पत्रकार संदीप महाजन यांना जीवे मारण्याची धमकी देणारे व नंतर काही गुंडांकडून पत्रकारावर हल्ला करणारे आमदार किशोर पाटील यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करुन कठोर कारवाई करण्याची मागणी मराठी पत्रकार परिषद व पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे.
या मागणीसाठी पत्रकारांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांची शुक्रवारी (दि.11 ऑगस्ट) भेट घेऊन राज्यात वारंवार पत्रकारांवर हल्ले होत असल्याचा निषेध व्यक्त करुन पत्रकार संरक्षण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबतचे निवेदन दिले. यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे राज्य सरचिटणीस मन्सूर शेख, पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे जिल्हा निमंत्रक महेश देशपांडे, बंडू पवार, संतोष आवारे, निशांत दातीर, लैलेश बारगजे, सुशील थोरात, मिलिंद देखणे, कुणाल जायकर, मोहनीराज लहाडे, वाजिद शेख, साजिद शेख, विजय सांगळे, शुभम पाचारणे आदी उपस्थित होते.


जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांच्यावर बुधवारी भ्याड हल्ला करण्यात आला. तत्पूर्वी त्यांनी दिलेल्या एका बातमीवरून संतापलेल्या आमदार किशोर पाटील यांनी अत्यंत अर्वाच्य भाषेत महाजन यांना शिवीगाळ केली. त्याचा रेकॉर्डिंग व्हायरल झाल्यानंतर उभा महाराष्ट्र नि:स्तब्ध झाला. एक लोकप्रतिनिधी एवढी अर्वाच्य भाषा वापरू शकतो, असा प्रश्‍न महाराष्ट्राला पडला आहे. किशोर पाटील यांनी केवल शिव्या दिल्या नाही, तर महाजन यांना जीवे मारण्याची धमकी दिली. हे सारे संतापजनक आणि निषेधार्ह असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.


गुरुवारी सकाळी ज्या गुंडांनी महाजन यांच्यावर हल्ला केला, तो व्हिडिओ देखील सर्वत्र व्हायरल झाला आहे. ज्या गुंडांनी महाजन यांच्यावर हल्ला केला, ते देखील नेहमी आमदार किशोर पाटील यांच्याबरोबर असतात, असा महाजन यांचा आरोप आहे. आरोपींची आणि किशोर पाटील यांचे मोबाईल संभाषण तपासले तर किशोर पाटील यांचाच हा कट असल्याचे दिसून येणार असल्याचेही महाजन यांनी स्पष्ट केले आहे.


पत्रकारास अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करुन, त्याच्यावर हल्ला करुन पत्रकारांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या आमदार किशोर पाटील यांच्यावर कठोर कारवाई झाली नाही, तर महाराष्ट्रातील पत्रकारांच्या सर्व प्रमुख संघटना एकत्र येऊन तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्रात पत्रकारांवरील हल्ल्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे काम करणे अवघड होत आहे. माध्यमांची मुस्कटदाबी चिंताजनक असून, हे कदापि सहन केले जाणार नाही. राज्यात पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी होत नसल्याने कायद्याचा धाक उरला नसल्याचे म्हंटले आहे.


पत्रकार महाजन यांच्यावर झालेल्या हल्ल्याची सखोल चौकशी करून, या हल्ल्यामागचे सूत्रधार असलेले आमदार किशोर पाटील यांच्या विरोधात पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा व राज्यात पत्रकारांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी पत्रकार संरक्षण कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याची मागणी मराठी पत्रकार परिषद व पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *