• Fri. Mar 14th, 2025

पांढरीपुल, खोसपुरी परिसरातील सराईत गुंडांवर तडीपारची कारवाई होण्यासाठी उपोषण

ByMirror

Jun 8, 2023

सह्याद्री छावा संघटनेच्या उपोषणात ग्रामस्थांचा सहभाग

कलाकेंद्राच्या नावाखाली वेश्या व्यवसाय, हॉटेलमध्ये गुंडांना ठेऊन ग्रामस्थांना मारहाण, हॉटेलचे अतिक्रमण व कामगार कायद्याच्या पायमल्लीचा आरोप

अहमदनगर (प्रतिनिधी)- पांढरीपुल, खोसपुरी परिसरातील सराईत गुंड असलेल्या व कलाकेंद्राच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालवून गुंड प्रवृत्तीच्या कामगारांना हाताशी धरुन ग्रामस्थांना मारहाण करणार्‍या व विविध पोलीस स्टेशनला गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असलेल्या त्या आरोपींवर तडीपारची कारवाई व्हावी, कलाकेंद्राचा परवाना रद्द करावा व त्यांच्या हॉटेलचे अतिक्रमण हटविण्याच्या मागणीसाठी सह्याद्री छावा संघटनेच्या वतीने उपोषण करण्यात आले.


वांजोळी (ता. नेवासा) लावण्य मंदिर येथे सह्याद्री छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब काळे यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या चक्री उपोषणात ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. उपोषणाच्या तिसर्‍या दिवशी पोलीस प्रशासनाने संबंधित आरोपींवर तडीपाराचा प्रस्ताव देण्याचे व सहाय्यक कामगार आयुक्तांनी कामगार कायद्याची पायमल्ली होत असल्याची चौकशी आणि नेवासा तहसिल कार्यालयाने विनापरवाना बांधका, अतिक्रमण संबंधित तक्रारीवर चौकशी करुन कारवाई करण्याचे आश्‍वासन दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले. यावेळी सरपंच आप्पा खंडागळे, उपसरपंच मंगेश पागिरे, सुभाष खंडागळे, भगवान येळवंडे, महेश काळे, रामा खंडागळे, पोपट खंडागळे, मिनीनाथ खंडागळे, सुभाष साळवे आदी उपस्थित होते.


पांढरीपुल, खोसपुरी परिसरातील ते गुंड प्रवृत्तीचे लोक कामगारांना हाताशी धरून ग्रामस्थांना मारहाण करतात. त्यांच्याविरुद्ध पाथर्डी, राहुरी, सोनई पोलीस स्टेशन व एमआयडीसी पोलीस स्टेशन मध्ये महिला अत्याचार, खंडणी, रस्ता लूट, विनापरवाना दारू विक्री आदी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. तसेच त्यांच्या खोसपुरी येथील कला केंद्रावर वेश्याव्यवसाय चालवला जात असल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे.


यापूर्वी कारवाई झालेल्या व पुन्हा वेश्याव्यवसाय सुरू झालेल्या खोसपुरी येथील त्या कलाकेंद्रावर कारवाई करावी करुन त्या कलाकेंद्राचा परवाना रद्द करावा, वांजोळी येथे विनापरवाना केलेले बांधकाम व रस्त्यावरील अतिक्रमण तात्काळ काढण्यात यावे, एमआयडीसी औद्योगिक विकास महामंडळच्या पाईपलाईन मधून बेकायदेशीरपणे घेतलेली नळ जोडणी बंद करावी, हॉटेल शिवनेरीचे रस्त्यावरील अतिक्रमण हटवून वाहतुक कोंडीची अडचण दूर करावी, संबंधित आरोपी त्यांच्या हॉटेलमध्ये व्यवसायासाठी गुंड प्रवृत्तीच्या लोकांना कामावर ठेऊन कामगार कायद्याचे उल्लंघन करत असल्याचे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *