• Thu. Jan 1st, 2026

पत्रकार हल्लाविरोधी कृती समितीच्या अहमदनगर शाखेचे पुनर्गठन

ByMirror

Mar 16, 2023

समन्वयक म्हणून महेश देशपांडे, बंडू पवार, श्रीकांत वंगारी, प्रणित मेढे यांचा समावेश

अहमदनगर (प्रतिनिधी)- अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद पत्रकार हल्लाविरोधी कृती समिती अहमदनगर शाखेचे पुनर्गठन मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस.एम.देशमुख, अध्यक्ष शरद पाबळे यांच्या सूचनेनुसार करण्यात आले आहे.


परिषदेचे सरचिटणीस मन्सुरभाई शेख हे या समितीचे जिल्हा निमंत्रक असून समितीमध्ये ज्येष्ठ पत्रकार महेश महाराज देशपांडे, पत्रकार बंडू पवार, वृत्त छायाचित्रकार प्रतिनिधी म्हणून श्रीकांत वंगारी तर डिजिटल मीडियाचे प्रतिनिधी म्हणून प्रणित मेढे यांची समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.


गेल्या काही दिवसांमध्ये पत्रकारांवरील हल्ल्याचे प्रमाण वाढले आहे. या विरोधात मराठी पत्रकार परिषद सातत्याने आवाज उठवत आहे. तसेच या अनुषंगाने प्रत्येक जिल्ह्यातील पत्रकार हल्लाविरोधी कृती समितीचे पुनर्गठण परिषदेने सुरु केले आहे. त्यानुसार अहमदनगर येथील समितीचे पुनर्गठन करण्यात आले आहे.


पत्रकारांवर होणार्‍या हल्ल्याच्या विरोधात आवाज उठवणे, पत्रकारावर हल्ला झाल्यास त्याला मदत व न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे, प्रशासन व पत्रकार यांच्यामध्ये दुवा म्हणून काम करणे आदी कामे या समितीमार्फत करण्यात येणार आहेत.


पत्रकार हल्लाविरोधी समितीमध्ये समावेश झाल्याबद्दल महेश महाराज देशपांडे, बंडू पवार, श्रीकांत वंगारी, प्रणित मेढे यांचे परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस.एम.देशमुख, विश्‍वस्त किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे, कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, नाशिक विभागीय सचिव रोहिदास हाके, राज्य संपर्क प्रमुख अनिल महाजन, अहमदनगर दक्षिण जिल्हाध्यक्ष सूर्यकांत नेटके, अहमदनगर उत्तर जिल्हाध्यक्ष अमोल वैदय यांच्यासह प्रमुख पदाधिकार्‍यांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *