युवकांनी दिला नेताजींच्या ज्वाजल्य देशभक्तीच्या कार्याला उजाळा
विषयाचे आकलन करून साचेबद्ध पद्धतीने विचार मांडल्यास प्रभावी वक्तृत्व निर्माण होते -डॉ. अमोल बागुल
अहमदनगर (प्रतिनिधी)- विषयाचे आकलन करून साचेबद्ध पद्धतीने विचार मांडल्यास प्रभावी वक्तृत्व निर्माण होते. वक्तृत्वला धार मिळण्यासाठी वाचन आवश्यक आहे. विषय समजून घेऊन शब्दांची योग्य मांडणी केल्यास वक्तृत्व बहरत जाते. शब्दांचा उच्चार, वाक्यानुसार कमी जास्त आवाजांची उंची, सुस्पष्टपणा प्रभावी वक्तृत्वासाठी आवश्यक असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त डॉ. अमोल बागुल यांनी केले.
नेहरू युवा केंद्राच्या वतीने नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी परीक्षक म्हणून डॉ. बागुल बोलत होते. भीमा गौतमी वसतीगृहाच्या सभागृहात झालेल्या वक्तृत्व स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी शासनाचा जिल्हा आदर्श युवा पुरस्कार विजेते अॅड. महेश शिंदे, पोपट बनकर, प्रगती फाउंडेशनच्या अश्विनी वाघ, प्रा. मंगल भोसले, आरती शिंदे, अनिता गणगे, कविता डवरे, रजनी जाधव, दिनेश शिंदे, जयश्री शिंदे आदी उपस्थित होते.
अॅड. महेश शिंदे म्हणाले की, भारतीय स्वतंत्र लढ्यात नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे अमूल्य योगदान आहे. प्रखर बुद्धिमत्ता, अलोकिक देशभक्ती असणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे नेताजी होय. त्यांचे विचार व कार्य युवा पिढीला प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.
या वक्तृत्व स्पर्धेत युवकांना नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे जीवन कार्य व स्वतंत्र लढ्यातील योगदान हा विषय देण्यात आला होता. या स्पर्धेतून युवकांनी नेताजींच्या कार्याला उजाळा देवून त्यांच्या ज्वाजल्य देशभक्तीचे कार्य सर्वांपुढे मांडले. स्पर्धेसाठी नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक शिवाजी खरात, कार्यक्रम अधिकारी सिद्धार्थ चव्हाण, रमेश गाडगे यांचे मार्गदर्शन लाभले.
