अहमदनगर (प्रतिनिधी)- कर्मयोगी प्रतिष्ठानच्या वतीने मुकुंदनगर येथील शेख कामिल अहमद याने नुकत्याच झालेल्या नीट 2023 च्या परीक्षेत 99.19 टक्के गुण मिळवल्याबद्दल त्याचा गौरव करण्यात आला. तसेच रोझीना रिजवान अहमद हिने इयत्ता दहावी बोर्डाच्या परीक्षेत 91 टक्के गुण मिळवल्याबद्दल तिचा देखील सत्कार करण्यात आला.
विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्याप्रसंगी माजी समाजकल्याण अधिकारी रफिक मुन्शी, माजी नगरसेवक हाजी मुस्ताक कुरेशी, त्वचारोग तज्ञ डॉ. एम. के. शेख, शरद पवार होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डॉ. रिजवान अहमद, इंजि. अनिश शेख, सामाजिक कार्यकर्ते समीर खान, शफी जागीरदार, नफीस चुडीवाले, अजीम जहागीरदार, इंजि. कामरान अहमद, तौसिफ शेख आदी उपस्थित होते.

रफिक मुन्शी म्हणाले की, शिक्षणाने कर्तृत्व सिध्द करुन प्रगती साधली जाते. अल्पसंख्यांक समाजातील मुला-मुलींनी स्पर्धा परीक्षांकडे वळण्याची गरज आहे. अनेक विद्यार्थ्यांमध्ये क्षमता असून, देखील ते शिक्षणाकडे दुर्लक्ष करतात. शिक्षणाने उद्याचे भवितव्य घडणार आहे. मुलांना आवड असलेल्या क्षेत्रात प्रोत्साहन देऊन पालकांनी त्यांना उच्च शिक्षणाची जोड देण्याचे त्यांनी सांगितले. उपस्थितांनी दोन्ही गुणवंत विद्यार्थ्यांना फेटे बांधून व पेढा भरवून सत्कार केला.
शेख कामिल अहमद याने नीट मध्ये घवघवीत यश संपादन केले आहे. तर त्याला बारावी बोर्डाच्या परीक्षेत 83.17 टक्के गुण मिळवून महाविद्यालयात प्रथम आला होता. या यशाबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.