सहाय्यक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख, उत्पादन शुल्कचे निरीक्षक गोपाल चांदेकर, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी सुभाष सोनवणे यांना पुरस्कार जाहीर
अहमदनगर (प्रतिनिधी)- नेहरु युवा केंद्र, जिल्हा क्रीडा कार्यालय संलग्न स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ आणि धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने निमगाव वाघा (ता.नगर) येथे छत्रपती संभाजी महाराज व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त शनिवारी (दि.27 मे) काव्य संमेलनचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे यांनी दिली.
संस्थेच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव विविध सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात येत असून, विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. काव्य संमेलनमध्ये जिल्ह्यातील नामवंत कवी व नवोदित कवी सहभागी होणार आहे. काव्य संमेलनाचे उद्घाटन आमदार निलेश लंके यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख, उत्पादन शुल्कचे निरीक्षक गोपाल चांदेकर, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी सुभाष सोनवणे यांना पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. तर कवी रज्जक शेख, शब्दगंध साहित्य परिषदेच्या शर्मिला गोसावी, कवी आनंदा साळवे यांची उपस्थिती राहणार आहे.

कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणून मिमिक्री कलाकार तथा अभिनेते आशिष सातपुते आपल्या कलेचे सादरीकरण करणार आहेत. सातपुते विविध अभिनेते, राजकीय पुढारी यांचे हुबेहुब आवाज काढतात. साई बाबांची भूमिका देखील त्यांनी उत्तमरित्या साकारली आहे. तर विविध क्षेत्रात निस्वार्थपणे सामाजिक योगदान देणार्या व्यक्तींना यावेळी उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते स्वराज्य भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.