विविध ठिकाणी झाले अभिवादन
महापुरुषांचे आदर्श समोर ठेवल्यास समाज भरकटणार नाही -पै. नाना डोंगरे
अहमदनगर (प्रतिनिधी)- महापुरुषांचा आदर्श ठेवल्यास भावी पिढी सुसंस्कारित होणार आहे. चुल व मूल या संकल्पनेला छेद देत, महात्मा फुलेंनी महिलांना शिक्षणाचे दार उघडे करुन दिले. सक्षम समाजव्यवस्था निर्माण होण्याच्या दृष्टीकोनातून त्यांनी मुलींसाठी शाळा उघडल्या. मुलगी वाचवा… मुलगी शिकवाचा संदेश त्यांनी त्याकाळी समाज व्यवस्थेला दिला. या महापुरुषांचे आदर्श समोर ठेवल्यास समाज भरकटणार नाही, असे प्रतिपादन पै. नाना डोंगरे यांनी केले.
निमगाव वाघा (ता. नगर) येथे महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. गावात विविध ठिकाणी अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ, धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय, नवनाथ विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने नवनाथ विद्यालयात महात्मा फुले जयंतीच्या कार्यक्रमात पै. डोंगरे बोलत होते.

तसेच ग्रामपंचायत कार्यालय व गावातील जय तुळजा भवानी युवा प्रतिष्ठानच्या वतीने महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक किसन वाबळे, ग्रामविकास अधिकारी गोवर्धन राठोड, निळकंठ वाघमारे, चंद्रकांत पवार, लक्ष्मण चौरे, युवा मंडळाचे अध्यक्ष संदीप डोंगरे, सचिव प्रतिभा डोंगरे, गणेश पुंड, संदेश शिंदे, संजय शिंदे, सुभाष पुंड, उत्तम कांडेकर, मंदा साळवे, सुवर्णा जाधव, तुकाराम खळदकर, तेजस केदारे, वाचनालयाचे उपाध्यक्षा प्रियंका डोंगरे, अशोक डौले, भानुदास लंगोटे, मयुर पुंड, सोमनाथ आतकर, एकनाथ डोंगरे, सागर केदार आदींसह विद्यार्थी, गावातील युवक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्याध्यापक किसन वाबळे म्हणाले की, स्त्री शिक्षणाचे महत्त्व त्याकाळी महात्मा फुलेंनी जाणले होते. आजची स्त्री महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या कार्याने सक्षम बनली आहे. पालकांनी देखील शिक्षणाचे महत्त्व ओळखून मुलगा-मुलगी भेदभाव न करता मुलींना उच्च शिक्षित करण्याचे आवाहन त्यांनी केले. डोंगरे संस्थेने घेतलेल्या कार्यक्रमास नेहरु युवा केंद्राचे उपनिदेशक शिवाजी खरात, जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले यांचे मार्गदर्शन लाभले.