डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ, धर्मवीर ग्रामीण वाचनालयाच्या वतीने
नवरात्रोत्सवा निमित्त विविध सामाजिक व धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन
अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे नवरात्रोत्सवानिमित्त जगदंबा मातेच्या मंदिरात विधीवत घटस्थापना करण्यात आली. स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने विविध सामाजिक व धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
मंदिरात देवीची पूजा करुन घटस्थापना करण्यात आली. यावेळी डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै.नाना डोंगरे, पीएसआय छगन कापसे, सोसायटीचे संचालक जालिंदर आतकर, भाऊसाहेब डोंगरे, उद्योजक कोंडीभाऊ फलके, संगिता आतकर, रघुनाथ डोंगरे, सुनिल दरंदले, आंचल दरंदले, लालू शिंदे, युवा मंडळाचे अध्यक्ष संदिप डोंगरे, सचिव प्रतिभा डोंगरे आदींसह भाविक उपस्थित होते.
गावापासून दिड किलोमीटर लांब डोंगराच्या पायथ्याला जगदंब मातेचे मंदिर असून, पंढरपुरच्या विठ्ठल मंदिराच्या धर्तीवर या मंदिराचे जीर्णोध्दार करण्यात आले आहे. जागृत देवस्थान म्हणून मंदिराची ख्याती असून, नवरात्रोत्सवा निमित्त मंदिरात पंचक्रोशीतील भाविक दर्शनास येतात. नवरात्रीनिमित्त मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. नेहरु युवा केंद्र व जिल्हा क्रीडा कार्यालय संलग्न स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने नवरात्रोत्सवात स्वच्छता अभियान राबवून मुलगी वाचवा… मुलगी शिकवा संदेश देण्यात येणार आहे. तसेच युवकांसाठी व्यसनमुक्तीवर जनजागृती कार्यक्रम व ग्रामस्थांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पै. नाना डोंगरे यांनी दिली.

