• Thu. Mar 13th, 2025

निमगाव वाघात बकरी ईद व आषाढी एकादशी उत्साहात साजरी

ByMirror

Jun 29, 2023

एकमेकांच्या सण-उत्सवात सहभागी होऊन जातीय सलोख्याचे दर्शन

आषाढी एकादशीला कुर्बानी न करण्याचा मुस्लिम समाजाचा निर्णय

अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे बकरी ईद व आषाढी एकादशी उत्साहात साजरी करुन ग्रामस्थांनी धार्मिक ऐक्याचे दर्शन घडविले. गावात सकाळी मुस्लिम बांधवांनी ईदची नमाज पठण केली. तर विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विधीवत पूजा पार पडली. नमाज व पूजेनंतर एकत्र आलेल्या हिंदू-मुस्लिम बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. मुस्लिम बांधवांनी आषाढी एकादशीनिमित्त गुरुवारी कुर्बानी न करता, दुसर्‍या दिवशी कुर्बानी करण्याचा निर्णय घेतला होता.


श्री नवनाथ युवा मंडळ, स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था व धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देऊन निघालेल्या बाल वारकर्‍यांच्या दिंडीचे स्वागत करण्यात आले. सकाळी 9 वाजता गावात ईदची नमाज मौलाना इलियास यांच्या मार्गदर्शनाखाली पठण करण्यात आली. यावेळी शांतता व समृध्दीसाठी अल्लाह चरणी प्रार्थना करण्यात आली. विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात ग्रामपंचायत सदस्य तथा डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे यांच्या हस्ते आरती करण्यात आली. या कार्यक्रमासाठी चांद शेख, नवाब शेख, ह.भ.प. विठ्ठल फलके महाराज, जावेद शेख, गुड्डू शेख, सलिम शेख, पिंटू जाधव, युवा मंडळाचे अध्यक्ष संदीप डोंगरे, दिलीप शेख, मयुर काळे, सत्तार शेख, श्रीरंग आतकर, देवराम फलके, राजेंद्र कापसे, रामा पुंड, आदम शेख, सभाजी कापसे, दिलावर शेख, अब्दुल शेख, बख्तार सय्यद, सोमा फलके, विनोद आतकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.


श्री नवनाथ वारकरी शिक्षण संस्था व नवनाथ विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी गावातून आषाढी एकादशीनिमित्त दिंडी काढली होती. डोक्यावर टोपी, पायजमा, बंडी या पोशाखात लहान मुले तर रंगीबेरेंगी साड्या परिधान करुन डोक्यावर तुलस घेऊन मुली सहभागी झाल्या होत्या. हातात भगवे ध्वज, टाळ-मृदूंगचा निनाद, ज्ञानोबा-तुकोबांचा जयघोष केला. विठ्ठल-रुक्मिणीच्या वेशभुषेत सहभागी झालेले विद्यार्थी या दिंडीचे आकर्षण ठरले.


पै.नाना डोंगरे म्हणाले की, महाराष्ट्रात सर्व धर्मिय गुण्यागोविंदाने नादतात, ही पुरोगामी महाराष्ट्राची ओळख आहे. बकरी ईद व आषाढी एकादशीच्या निमित्ताने याचा प्रत्यय सर्वांना आला. सुफी-संतांच्या पावन भूमीत जात, धर्म व पंथाचा भेदभाव होत नाही. माणुसकी हाच खरा धर्म असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *