• Fri. Sep 19th, 2025

नायगावच्या मस्जिद व कब्रस्तानच्या जागेतील अतिक्रमण हटविण्याची मागणी

ByMirror

Jun 2, 2023

मुस्लिम समाजाचे अप्पर जिल्हाधिकारी यांना निवेदन

पूर्वजांची कबर जेसीबीने पाडून विटंबना केल्याचा आरोप

अहमदनगर (प्रतिनिधी)- मुस्लिम समाजाच्या जामखेड तालुक्यातील नायगाव येथे असलेल्या मस्जिद व कब्रस्तानच्या जागेत अतिक्रमण करुन पूर्वजांची कबर जेसीबीने पाडून विटंबना करणार्‍या त्या व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी नायगाव मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.

मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाने अप्पर जिल्हाधिकारी सुहास मापारी यांची भेट घेऊन सदर मागणीचे निवेदन दिले. मुस्लिम समाजाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या वतीने पाठिंबा देण्यात आला आहे. यावेळी रिपाईचे जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे, नगर तालुकाध्यक्ष अविनाश भोसले, शब्बीर मुलानी, अकबर मुलानी, मोईन सय्यद, अन्वर सय्यद, अमीन मुलानी, अय्युब सय्यद, सिकंदर सय्यद, अब्बास सय्यद, मोहिद्दीन सय्यद, नासिर सय्यद आदी मुस्लिम समाजबांधव उपस्थित होते.


नायगाव (ता. जामखेड) येथे मुस्लिम समाजाच्या मालकीची मस्जिद व कब्रस्तानची जागा आहे. या जागेत एका व्यक्तीने अतिक्रमण केले आहे. तसेच पूर्वजांची कबर जेसीबीने उकरून त्यावर मुरूम पसरविला आहे. सदरील इसमाने त्या जागेवर पक्के घर बांधून तेथे जुगार अड्डा सुरू केला आहे. वारंवार विनंती करून सुद्धा सदरील व्यक्ती ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाही. गावातील सरपंच, उपसरपंच यांना हाताशी धरून त्याने उतार्‍यावर नाव लावून घेतले आहे. पूर्वजांच्या कबर जेसीबीने पाडून त्याची विटंबना केली आहे. सदर व्यक्ती विरोधात खर्डा पोलीस स्टेशन तक्रार देण्यास गेले असता तक्रार देखील घेण्यात आलेली नाही.

तहसीलदार, पोलीस निरीक्षक, गट विकास अधिकारी सहकार्य करीत नसल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
सदर व्यक्तीच्या विरोधात तक्रार केल्याने तो शिवीगाळ करून दमबाजी करत आहे. पूर्वजांच्या कबरीची विटंबना करणार्‍या समाजकंटकावर गुन्हा दाखल करावा, कब्रस्तान व मस्जिदच्या जागेत केलेले अतिक्रमण त्वरित काढून घेण्याची कार्यवाही करण्याची मागणी मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. सदर प्रकरणात मुस्लिम समाजाच्या भावना तीव्र असून, अतिक्रमण न हटविल्यास उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *