कोट्यावधीचे बनावट दागिने प्रकरण
अहमदनगर (प्रतिनिधी)- बनावट सोने तारण प्रकरणात कोतवाली पोलीस स्टेशन येथे दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते. या बनावट सोने तारण प्रकरणात शहर बँकेत आतापर्यंत 8 हजार 933 ग्रॅम म्हणजेच सुमारे 9 किलो बनावट दागिने आढळून आले आहेत. याप्रकरणी 41 जणांविरुद्ध गुन्हा दाखल असून 3.22 कोटींची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.
तसेच संत नागेबाबा मल्टीस्टेट सोसायटीमध्ये 8 हजार 564 ग्रॅम म्हणजेच सुमारे साडेआठ किलो बनावट दागिने आढळून आले आहेत. या गुन्ह्यात 63 आरोपींचा समावेश असून, आत्तापर्यंतच्या तपासणीत 2.88 कोटींची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला होता.
आर्थिक गुन्हे शाखेने तपास पूर्ण करून शहर बँक प्रकरणातील 41 आरोपींविरुद्ध दोषारोप पत्र न्यायालयात सादर केले आहे. नागेबाबा सोसायटी प्रकरणी 63 आरोपीं विरुद्ध दोषारोप पत्र सादर करण्यात आले होते.
दोन्ही गुन्ह्यांमध्ये अटक असलेले आरोपी यांनी अॅड. सरिता एस. साबळे यांच्यामार्फत जामीन अर्ज जुडीशियल मॅजीस्ट्रेट कोर्ट, अहमदनगर यांच्यासमोर करण्यात आला होता. सदर प्रकरणात आरोपींच्या वतीने युक्तिवाद करून आरोपी सुनील ज्ञानेश्वर आळकुटे, रितेश रमेश पाणपाटील, अनिकेत सुनील आर्या व ज्ञानेश्वर रतन कुताळ यांना या दोन्ही प्रकरणात जामीन मंजूर झाला आहे. आरोपींच्या वतीने अॅड. सरिता एस. साबळे व अॅड. सतीश गीते यांनी काम पाहिले.
