दादापाटलांनी सर्वसामान्य जनतेचे कल्याण हेच विचार व ध्येय ठेऊन आयुष्यभर कार्य केले -साहेबराव बोडखे
अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील नवनाथ विद्यालयात लोकनेते माजी खासदार स्व. दादापाटील शेळके यांना जयंतीनिमित्त नवनाथ विद्यालय, स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने अभिवादन करण्यात आले. नवनाथ विद्या प्रसारक मंडळाचे संस्थापक असलेले स्व. शेळके यांच्या स्मरणार्थ नवनाथ विद्यालयात वृक्षरोपण अभियान राबविण्यात आले.
नगर तालुका खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन साहेबराव बोडखे यांच्या हस्ते स्व. दादापाटील शेळके यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन वृक्षरोपण करण्यात आले. यावेळी प्रभारी मुख्याध्यापक उत्तम कांडेकर, डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै.नाना डोंगरे, नामदेव फलके, चंद्रकांत पवार, मंदा साळवे, सुवर्णा जाधव, भानुदास लंगोटे, तेजस केदारी, युवा मंडळाचे अध्यक्ष संदिप डोंगरे, तृप्ती वाघमारे, अमोल वाबळे, प्रशांत जाधव, प्रमोद थिटे, प्रतिभा डोंगरे, प्रियंका डोंगरे-ठाणगे आदींसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

साहेबराव बोडखे म्हणाले की, स्व.दादापाटील शेळके यांच्या दूरदृष्टीमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात आले. सर्वसामान्यांना त्यांनी नेहमीच आधार देण्याचे काम केले. सध्याचे राजकारण फक्त स्वहित व सत्तेसाठी सुरु असून, दादापाटलांनी सर्वसामान्य जनतेचे कल्याण हेच विचार व ध्येय ठेऊन आयुष्यभर कार्य केले असल्याचे त्यांनी सांगितले. प्रास्ताविकात प्रभारी मुख्याध्यापक उत्तम कांडेकर यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळण्यासाठी शैक्षणिक संस्था उभारणीसाठी स्व.दादापाटील शेळके यांनी दिलेल्या योगदानाचा आढावा घेतला.
पै. नाना डोंगरे म्हणाले की, स्व.दादापाटील शेळके यांनी जनतेची सेवा केली. सत्तेसाठी त्यांनी कधी निष्ठा व विचारांशी तडजोड केली नाही. शैक्षणिक संस्था स्वत:च्या ताब्यात न ठेवता प्रत्येक गावाच्या विकासासाठी योग्य व्यक्तीच्या ताब्यात दिल्या. आज या संस्थेतून अनेक गुणवंत विद्यार्थी घडले असून, ग्रामीण भागात शिक्षणाची गंगा आणण्याचे काम दादा पाटलांनी केले असल्याचे त्यांनी सांगितले.