15 ते 17 दिवसानंतरही पाण्याचा टँकर मिळत नसल्याने नागरिक संतप्त
नगरसेवक अनिल शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांचे आयुक्तांना निवेदन
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहराच्या प्रभाग 15 मधील नगर-कल्याण रोड परिसरात 15 ते 17 दिवसानंतर पाण्याचा टँकर येत असल्याने उन्हाळ्यात निर्माण झालेली पाणी टंचाई दूर करण्यासाठी व वेळेवर पाण्याचे टँकर पाठवून नियोजन करण्याच्या मागणीसाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा प्रभागाचे नगरसेवक अनिल शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी आयुक्त डॉ. पंकज जावळे यांना निवेदन दिले. तर वेळेवर पाण्याचे टँकर न पाठविता नागरिक व महिलांशी उद्धटपणे बोलणार्या त्या मनपाच्या कर्मचारीला हटविण्याची तक्रार आयुक्तांकडे करण्यात आली.
बुधवारी (दि.1 मे) महापालिकेत आयुक्त जावळे यांची भेट घेऊन सदरच्या पाणी प्रश्नावर चर्चा करण्यात आली. आयुक्त जावळे यांनी चार ते पाच दिवसात पाणी प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. यावेळी नगरसेवक अनिल शिंदे, खासेराव शितोळे, पारुनाथ ढोकळे, भगवान काटे, विजय गाडळकर, एकनाथ व्यवहारे, ओंकार शिंदे, बाळासाहेब ठुबे लक्ष्मण पोरे, रिंकू शहाणे, संगीता लाटे, मंगल लाटे, लता कुलकर्णी, अर्चना निकम, संदीप सोनवणे, ऋषिकेश चिंधाडे, केदार खाडे, राज वराडे, मारुती कुलट, संजय बोठे, रवी कलुसिया, सुनंदा भागवत, सुनील गुंजाळ, शिवाजी डेरे, निलेश लाटे, विठ्ठल आठरे, राजेश पठारे, संतोष ढगे, अशोक कर्डिले, दत्ता कर्डिले, अंकुश कदम, ललित सांगळे, अमर गोंधळे आदी उपस्थित होते.

कल्याण रोड परिसरात ज्यांना महापालिकेचे नळ कनेक्शन नाही, अशा नागरिकांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. मात्र उन्हाळ्यात या भागात दहा ते पंधरा दिवसांनी टँकर येत असल्याने मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. महापालिकेकडून टँकर वाटपासाठी नियुक्त करण्यात आलेला कर्मचारीला टँकरसाठी फोन लावल्यास तो फोन उचलत नाही. फोन उचलल्यास नागरिक व महिलांशी अतिशय उद्धटपणे बोलतो. या भागात पाण्याची बिकट परिस्थिती निर्माण झाल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
या परिसरात पाणी टँकर वाटपाचे योग्य नियोजन करावे, चार ते पाच दिवसांनी टँकर उपलब्ध करुन द्यावा, नागरिकांशी उध्दटपणे वागणार्या या कर्मचार्यांची बदली करून त्या ठिकाणी चांगल्या कर्मचारीची नियुक्ती करण्याची मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे. हा प्रश्न न सुटल्यास महापालिकेवर जनआक्रोश मोर्चा काढण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.