जिल्हाधिकार्यांची पाठीवरती कौतुकाची थाप
अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील उद्योजक श्रेयांश कुंदन कांकरिया याने गोवा येथे झालेल्या देशातील दुसरी हाफ आयर्न मॅन स्पर्धेत अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जाणारा हाफ आयर्न मॅनचा किताब पटकाविला. शारीरिक क्षमतेची कसोटी पाहणार्या या स्पर्धेत धावणे, पोहणे व सायकलिंगचा समावेश होता. ही स्पर्धा बोटावर मोजण्या इतक्याच जिल्ह्यातील स्पर्धकांनीच आत्तापर्यंत पूर्ण केली आहे.
हाफ आयर्न मॅनचा किताब पटकाविल्याबद्दल जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी श्रेयांश कांकरिया यांचा गौरव करुन पाठीवरती कौतुकाची थाप दिली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले, प्रशिक्षक अनुपम संकलेचा, कुंदन कांकरिया, स्मिता कुंदन कांकरिया, तृप्ती श्रेयश कांकरिया, भवरीलाल कांकरिया यांच्यासह जिल्हा प्रशासनातील अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गोवा येथे हाफ आयर्न मॅन स्पर्धा उत्साहात पार पडली. यामध्ये परदेशासह देशातील अनेक स्पर्धकांनी तसेच लष्करातील जवानांनी सहभाग नोंदवला होता. श्रेयांश कांकरिया याने उत्कृष्ट प्रदर्शन करीत 2 कि.मी. पोहणे, 90 कि.मी. सायकलिंग व 21 कि.मी. धावण्याची स्पर्धा त्यांनी दिलेल्या वेळेत पूर्ण केली. या कामगिरीने श्रेयांश खर्या अर्थाने लोहपुरुष ठरला आहे. या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
