शहरात रॅलीच्या स्वागताच्या तयारीचे नियोजन
धर्मा-धर्मातील द्वेष संपविण्यासाठी भाईचार्याचा संदेश घेऊन इन्सानियत अभियान रॅलीचे आयोजन -मुफ्ती सालम चाऊस
अहमदनगर (प्रतिनिधी)- पाकिस्तान, चीन या शत्रू राष्ट्रापेक्षा राजकारणासाठी देशात पसरत असलेली जातीय व धार्मिक विषमता अधिक घातक ठरत आहे. राजकीय पोळी भाजण्यासाठी समाजात जातीय द्वेष व एकमेकांबद्दल दुरावा निर्माण केला जात आहे. देशात अशांतता, द्वेष, जातीय मोर्चे, भडकाऊ भाषणे, दंगे यामुळे देश प्रगती साधू शकत नाही. धर्म-धर्मातील व समाजातील द्वेष संपविण्यासाठी व प्रेम, शांतता आणि भाईचार्याचा संदेश घेऊन नागपूर ते मुंबई इन्सानियत अभियान रॅलीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती अल इन्साफ फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मुफ्ती सालम चाऊस यांनी दिली.
शिवजयंतीच्या दिवशी रविवारी (दि.19 फेब्रुवारी) अल इन्साफ फाऊंडेशनच्या वतीने नागपूर येथून इंन्साफ लाओ, देश बचाओ!, हिंदू-मुस्लिम नफरत मिटाओ!! हे ब्रीदवाक्य घेऊन इन्सानियत अभियान रॅली काढण्यात येणार आहे. तर ही रॅली 1 मार्च रोजी अहमदनगर शहरात दाखल होत असून, याच्या नियोजनार्थ सर्जेपुरा येथील रहेमत सुलतान सभागृहात बैठक पार पडली. यावेळी मुफ्ती सालम बोलत होते. या बैठकीला वाहद बिनसाले चाऊस, मौलाना रियाज अहमद, वसीम सय्यद, मुस्ताक सर, हाफिज फैजान आदी उपस्थित होते.
पुढे मुफ्ती सालम म्हणाले की, या इन्सानियत अभियान रॅलीत राजकीय पक्ष व धर्मनिरपेक्ष विचारधारा असलेल्या स्वयंसेवी संघटना सहभागी होणार आहेत. देशाच्या एकता, अखंडता व एकात्मतेसाठी हे अभियान आहे. पक्षीय राजकारण बाजूला ठेऊन देशातील शांततेसाठी सर्वांना या रॅलीत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
तर देश हितासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. मातृभूमी असलेल्या देशाप्रती प्रत्येक मुस्लिम बांधवांचे प्रेम आहे, याबद्दल कोणाला देशभक्तीचा पुरावा देण्याची गरज नाही. योगायोगाने या अभियानाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दिनापासून सुरु होत असल्याचा आनंद आहे. शिवाजी महाराजांचा लढा मुघलांविरोधात होता, मुस्लिम विरोधात नव्हता. मात्र समाजात शिवाजी महाराज मुस्लिम विरोधी असल्याचे चित्र रंगविण्याचे काम सुरु आहे. शिवाजी महाराजांच्या सैन्यात अनेक महत्त्वाची जबाबदारी मुस्लिम सरदारांवर होती. जातीय द्वेष पसरविण्यासाठी चुकीचा इतिहास समोर आनला जात असल्याचे मुफ्ती सालम यांनी स्पष्ट केले.
25 दिवसाची ही रॅली असून ती नागपूरहून अहमदनगर मार्गे मुंबईला जाणार आहे. धर्मांधते विरोधात इन्कलाबचा नारा असून, यामध्ये 40 सामाजिक संघटनांनी सहभागी होण्याची सहमती दर्शवली आहे. अहमदनगर शहरात देखील या रॅलीचे उत्साहात स्वागत केले जाणार आहे. याचा समारोप मुंबईच्या ऑगस्ट क्रांती मैदानात होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
देशात एका धर्मा विरोधात भडकाऊ भाषण करणे चुकीचे आहे. सरकारने देखील भडकाऊ भाषण करुन जातीय व धार्मिक भावना दुखावणार्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. यामुळे संपूर्ण देशाची शांतता भंग होत आहे. भडकाऊ भाषण करणार्याला सरकार सुरक्षा देत असून, तर त्यांच्यामुळे समाजाला असुरक्षित होण्याची वेळ आली आहे. देशवासीयांमध्ये प्रेम, बंधुत्वत निर्माण करण्याच्या उद्देशाने इन्सानियत अभियान रॅलीचे आयोजन करण्यात आलेले आहे.
