वेळोवेळी आरोग्य तपासणीतून उद्भवणार्या गंभीर आजाराला तोंड देता येते -अभिलाष घिगे
अहमदनगर (प्रतिनिधी)- देऊळगाव सिद्धी (ता. नगर) येथील ग्रामस्थांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. केडगाव येथील साई स्पर्श सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल व झरेकर क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला.
कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अभिलाष घिगे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी दादाभाऊ चितळकर, पी.एस. बोरकर, दादा बोठे, नानासाहेब बोरकर, मधुमेह व हृदयरोग तज्ञडॉ. परमेश्वर काळे, स्त्री रोग तज्ञ डॉ. शिल्पा पाठक, अस्थिरोग तज्ञ डॉ. रोहन धोत्रे, फिजिशियन डॉ. अमोल जाडकर, संतोष राहिंज, राकेश थोरात, नरेंद्र झरेकर, वृषाली शेळके, सोमनाथ वाघ, विरेंद्र लोखंडे आदी उपस्थित होते.
अभिलाष घिगे म्हणाले की, शिबिराच्या माध्यमातून वेळोवेळी आरोग्य तपासण्या करुन उद्भवणार्या गंभीर आजाराला तोंड देता येते. आरोग्याबाबत जागृक न राहिल्यास मोठ्या कठिण परिस्थितीतून जावे लागते. सर्वसामान्यांना इच्छा असताना देखील आर्थिक परिस्थिती नसल्याने आरोग्य तपासणी करण्यास अडचण येते. यासाठी या शिबिराच्या माध्यमातून सर्वसामान्यांना संपूर्ण आरोग्य तपासणीची संधी उपलब्ध होत असल्याचे त्यांनी सांगितले.
ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिकांची अनेक वर्षापासून रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर घेण्यात येत असल्याचे साई स्पर्श हॉस्पिटलच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. या शिबिरात उच्च रक्तदाब, मधुमेह व हिमोग्लोबीन तपासणी करुन उपस्थितांना निरोगी आरोग्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. शिबार्थींना पुढील उपचारासाठी विशेष सुट देण्यात आली आहे.