पेढे वाटून राज्य सरकारच्या निर्णयाचे स्वागत
दिव्यांग मंत्रालयाच्या माध्यमातून प्रश्न सुटण्यास मदत होणार -अॅड. पोकळे
अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्यामध्ये स्वतंत्र्य दिव्यांग मंत्रालयाची घोषणा झाल्याबद्दल प्रहार अपंग क्रांती संस्थेच्या वतीने जल्लोष करुन राज्य सरकारच्या या निर्णयाचे स्वागत करण्यात आले.
मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व दिव्यांगांचे प्रश्न सोडविणारे राज्यमंत्री ओमप्रकाश बच्चुभाऊ कडू यांचे विशेष आभार मानण्यात आले. तर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय घोगरे, डॉ. प्रशांत तांदळे, डॉ. संतोष रासकर, डॉ. सोनवणे, डॉ. गुरवले रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांचा सत्कार करुन पेढे वाटण्यात आले. यावेळी आरोग्य कर्मचारी आरोग्य अधिकारी प्रशासनाचे मान्यवर सुरक्षारक्षक व इतर बांधवांना पेढे वाटून प्रहार अपंग संघटनेच्या वतीने मोठा जनसमुदाय उपस्थित होता आनंदमय सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष अॅड. लक्ष्मण पोकळे, शहर उपाध्यक्ष संदेश रपारिया, पारनेर तालुकाध्यक्ष अरविंद नरसाळे, राहुरी तालुकाध्यक्ष मधुकर घाडगे, श्रीगोंदा तालुकाध्यक्ष राजेंद्र पोकळे, श्रीगोंदा शहराध्यक्ष सचिन तोडकर, शहर संघटक नंदू होळकर, अर्चना नन्नवरे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हाध्यक्ष अॅड. लक्ष्मण पोकळे म्हणाले की, राज्यात दिव्यांगांचे प्रश्न गंभीर बनले होते. दिव्यांग मंत्रालयाच्या माध्यमातून त्यांचे प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. तर दिव्यांगांना सुखी, समाधानाने जीवन जगता येणार असून, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीमध्ये देखील वाढ होणार असल्याचे त्यांनी सांगितले.