सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी
अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचा उपोषणाचा इशारा
अहमदनगर (प्रतिनिधी)- तिसर्या अपत्याची माहिती शासनाकडून लपवून शासनाच्या 28 मार्च 2005 च्या शासन निर्णयाची पायमल्ली केल्याप्रकरणी श्रीरामपूरच्या गटशिक्षणाधिकारी यांना सेवेतून बडतर्फ करण्याची तक्रार अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनद्वारे केली आहे. एकवीस दिवसात या तक्रारीवर कारवाई न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
श्रीरामपूरच्या गटशिक्षणाधिकारी यांना सन 2005 नंतर तीन अपत्य असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. लोकसंख्या नियंत्रणासाठी शासकीय सेवेत असणार्या अ, ब, क, ड संवर्गातील अधिकारी कर्मचारी यांना सन 2005 नंतर तिसर्या अपत्य असल्यास शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना सेवेतून बडतर्फ करण्याचा 28 मार्च 2005 रोजीचा शासन निर्णय आहे. श्रीरामपूर गटशिक्षणाधिकारी यांना 2005 नंतर तिसरे अपत्य झाले असून, याबाबत माहिती शासनाला न कळविता लपविण्यात आलेली आहे. त्यांनी महाराष्ट्र नागरी सेवा (लहान कुटुंब प्रतिज्ञापत्र) नियमांची पायमल्ली केली असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
श्रीरामपूरच्या गटशिक्षणाधिकारी यांच्याकडून तिसर्या अपत्याबाबतची कागदपत्रे हस्तगत करून शासन निर्णयानुसार त्यांच्यावर कारवाई करून त्यांना सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी न्याय निवारण निर्मूलन सेवा समितीने केली आहे.