शिस्तबध्द संचलनासह योगासन, लाठी-काठीचे चित्तथरारक प्रात्यक्षिके
क्रीडा क्षेत्रात करिअरच्या अनेक संधी -भाग्यश्री बिले
अहमदनगर (प्रतिनिधी)- तक्षिला स्कूलचा वार्षिक क्रीडा महोत्सव विविध मैदानी स्पर्धाच्या थराराने उत्साहात पार पडला. बॅण्ड पथकाच्या निनादात विद्यार्थ्यांचे शिस्तबध्द संचलन, योगासन, लाठी-काठीच्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी उपस्थितांची मने जिंकली.

जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले यांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलीत करुन वार्षिक क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन झाले. स्कूलच्या प्राचार्या जयश्री मेहेत्रे यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा दिमाखात पार पडला. विद्यार्थ्यांनी संचलनातून उपस्थित पाहुण्यांना मानवंदना दिली. प्रारंभी विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले. यावेळी मोर नृत्य, लेझीम डाव, ढोल पथकासह सांस्कृतिक कार्यक्रम रंगला होता. या कार्यक्रमासाठी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले म्हणाल्या की, मुलांना आपल्या आवडीच्या क्षेत्रात भरारी घेण्यासाठी पालकांनी प्रोत्साहन द्यावे. क्रीडा क्षेत्रात करिअरच्या अनेक संधी निर्माण झाल्या आहेत. शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांना मैदानी खेळाकडे वळाले पाहिजे. मानसिक व शारीरिक स्वास्थ्य मैदानी खेळातून चांगले राहते. यासाठी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकासासाठी खेळ आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
प्राचार्या जयश्री मेहेत्रे म्हणाल्या की, मुलांच्या कला-गुणांना वाव देऊन त्यांचा विकास करणे ही तक्षिला स्कूलची परंपरा आहे. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी शाळेत वर्षभर विविध उपक्रम राबविण्यात येतात. शाळेतील खेळाडूंनी विविध स्पर्धेत राज्य व राष्ट्रीय स्तरापर्यंत मजल मारली आहे. आंतरराष्ट्रीय किर्तीचे खेळाडू घडविण्याचा शाळेचा मानस असल्याचे सांगून, त्यांनी शाळेचा वार्षिक अहवाल सादर केला.

वार्षिक क्रीडा महोत्सवात ड्रीबल, स्कीपिंग, शटल, सॅक रेस, स्लो सायकलिंग, बैटन रीले आदी विविध क्रीडा स्पर्धा पार पडल्या. स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना सन्मान चिन्ह, पदक व प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले. विविध क्रीडा स्पर्धेतील गुणवंत खेळाडू, राष्ट्रीय पदक विजेत्या खेळाडूंचा विशेष सन्मान करण्यात आला. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.

