• Tue. Jul 1st, 2025

ड्रीम सिटीला बेकायदेशीरपणे नळजोडणी देणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई करा

ByMirror

Mar 31, 2022

सामाजिक कार्यकर्ते वैभव कदम यांची आयुक्तांकडे मागणी

अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर-कल्याण रोड वरील ड्रीमसिटी अपार्टमेंटला केडगाव पाणी योजनेतून बेकायदेशीरपणे नळजोडणी देणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते वैभव कदम यांनी आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे. केडगावकर पाणी टंचाईला सामोरे जात असताना, त्यांचे पाणी पळविणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई व्हावी व ड्रीम सिटीची बेकायदेशीर नळजोडणी कट न झाल्यास येत्या पंधरा दिवसात महापालिकेसमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
नगर-कल्याण रोडवरील ड्रीम सिटी अपार्टमेंटला बेकायदेशीर नळजोडणी दिलेली आहे. सदरची नळजोडणी केडगाव पाणी योजनेतून देण्यात आलेली आहे. वास्तविक पाहता महापालिकेत अपार्टमेंटला फेज 2 च्या योजनेतून पाणी देण्याचा ठराव झालेला होता. तरी केडगाव पाणी योजनेतून त्यांना नळकनेक्शन देण्यात आले आहे. सदरचे नळ कनेक्शन केडगाव पाणी योजनेतून देण्याबाबत पाणीपुरवठा विभागातील अधिकार्‍यांनी कोणाच्या आदेशाने दिले?, त्यासाठी वरिष्ठांची परवानगी घेतली होती का? केडगाव पाणी योजनेतून नळकनेक्शन देण्याचा ठराव महापालिकेत झाला होता का? या सर्व प्रकरणाची चौकशी करण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
पाणीपुरवठा विभागातील अधिकारी आपल्या पदाचा दुरुपयोग करुन झालेल्या ठरावाच्या विरुध्द नळ कनेक्शन देऊन केडगावकरांचे हक्काचे पाणी पळविण्यात आले असल्याचा आरोप कदम यांनी केला आहे. ड्रीम सिटी अपार्टमेंट मधील नागरिकांना पाणी देण्यास आमचा विरोध नसून, महापालिकेत झालेल्या ठरवाप्रमाणे पाणी फेज 2 योजनेतून देण्याचे यावे, असे म्हंटले आहे. ड्रीम सिटी अपार्टमेंटला बेकायदेशीरपणे नळजोडणी देणार्‍या अधिकार्‍यांची चौकशी करुन दोषींवर कारवाई करावी व त्वरीत केडगाव पाणी योजनेतून ड्रीम सिटीला देण्यात आलेले नळ कनेक्शन कट करण्याची मागणी कदम यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *