अहमदनगर (प्रतिनिधी)- डॉ. विठ्ठलराव विखे पाटील परिचारिका महाविद्यालय व विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने परिचर्या महाविद्यालयाच्या सभागृहात परिचारिका दिन उत्साहात साजरा करण्यात आला. फ्लॉरेन्स नाईटिंगल यांच्या जयंती म्हणजेच आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन महाविद्यालयात विविध उपक्रमाचा सप्ताह राबविण्यात आला.
सप्ताहानिमित्त रांगोळी, पोस्टर स्पर्धेसह विविध कार्यक्रम घेण्यात आले. सप्ताहाच्या समारोपप्रसंगी प्रोफेसर डॉ. मंजु चुगानी (डि – स्कूल ऑफ नर्सिंग सायन्स अॅण्ड आलाईड हेल्थ विभाग प्रमुख – प्रसूतीशास्त्र आणि स्त्रीरोग नर्सिंग आणि पॅरामेडिकल सायन्सेस, जमिया हमदर्द युनिव्हर्सिटी, नवी दिल्ली) यांनी या वर्षीची परिचारिका दिनानिमीत्त घोषवाक्या असलेले आमची परिचारिका, आमचे भविष्य चे झूम अॅप द्वारे अनावरण केले.
प्रारंभी मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी नाटिका, कविता सादर करून परिचर्या क्षेत्राचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. फाउंडेशनचे डायरेक्टर डॉ. अभिजित दिवटे (वैद्यकीय) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. सतीश मोरे, सहाय्यक रजिस्ट्रार (क्लिनिकल) प्रसाद काजळे, मेट्रन जया गायकवाड, असिस्टंट मेट्रन रेबेका साळवे उपस्थित होते.

स्नेहालयाचे सी.ई.ओ. (यूके) जोयसी कोनोली, मिस्टर निक, लहान मुले व मुली, मलाबार गोल्ड अॅण्ड डायमंडस्चे प्रतिनिधींनी कार्यक्रमास उपस्थित राहून सर्व महाविद्यायातील शिक्षवृंद व हॉस्पिटल मधील सर्व परिचारिका यांचे पुष्पगुच्छ व भेट कार्ड देऊन अभिनंदन केले. मान्यवरांच्या उपस्थितीत सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला.
डॉ. अभिजित दिवटे यांनी परिचारिकांचे आजच्या युगातील महत्त्व व त्यांचे आर्थिक स्वातंत्र्य किती महत्त्वाचे असल्याचे आपल्या मनोगतमधून व्यक्त केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रतिभा चांदेकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. उपप्राचार्य डॉ. योगिता औताडे, अधिक्षक डॉ. सतीश मोरे, सहाय्यक प्राध्यापिका मोहिनी सोनवणे, सहाय्यक प्राध्यापिका आरती जाधव, क्लिनिकल प्रशिक्षक रेबेका साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला. अमोल टेमकर यांनी आभार मानले.
