पंचधातूचा पुतळा बसविण्याची मागणी
बहुजन समाज पार्टीचे मनपा आयुक्तांना निवेदन
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील मार्केटयार्ड येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्याच्या ठिकाणी बाबासाहेबांचा पूर्ण कृती पुतळा उभारण्याबाबत आराखडा तयार करण्याची मागणी बहुजन समाज पार्टीच्या वतीने महापालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

यावेळी शहराध्यक्ष संतोष जाधव, जिल्हा प्रभारी सुनील ओहोळ, जिल्हाध्यक्ष राजू शिंदे, सुनिल मगर, उपाध्यक्ष सिध्दार्थ पाटोळे, शहर सचिव राजू गुजर, बामसेफचे संयोजक प्रतिक जाधव, बाळासाहेब मधे, माजी जिल्हाध्यक्ष उमाशंकर यादव, गणेश बागल, प्रकाश आहिरे, संजय संसारे, जाकिर शाह, मच्छिंद्र ढोकणे, विठ्ठल म्हस्के, मोहन काळे, नितीन जावळे, अंबादास घोडके, अॅड. सिध्दार्थ बोधक, बाळकृष्ण काकडे, नवनाथ भवाळ आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
शहरातील मार्केटयार्ड येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहेब यांचा अर्ध कृती पुतळा आहे. त्याठिकाणी असलेले अतिक्रमण देखील उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे काढण्यात आलेले आहे. सदर ठिकाणी बाबासाहेबांचा पूर्ण कृती पुतळा असावा ही अनेक वर्षापासून आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांची मागणी आहे. महापालिका प्रशासनाने देखील सदर पूर्ण कृती पुतळा उभारण्याबाबत हालचाली सुरु केल्या आहे. मात्र हा पुतळा लवकरात लवकर उभारण्यासाठी महापालिका प्रशासनाने पुतळा उभारणीचा आराखडा तयार करण्याचे निवेदनात म्हंटले आहे.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्ण कृती पुतळा हा पंचधातूचा बसवण्यात यावा, पुतळयाची उंची ही कमीत कमी 10 मीटर असावी, पुतळ्याच्या परिसरात उद्यान उभारून सुशोभीकरण करण्यात यावे, पुतळ्याचे दर्शन घेण्यासाठी बैठक व्यवस्था करण्यात यावी, या परिसरात बाबासाहेबांच्या साहित्याचे वस्तू संग्रहालय व वाचनालयाची व्यवस्था करण्यात यावी, आदी गोष्टी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्ण कृती पुतळ्याच्या आराखड्यात समाविष्ट करण्याची मागणी बहुजन समाज पार्टीने केली आहे.
