राष्ट्रवादीच्या वतीने महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्याच्या ठिकाणी भव्य पूर्ण कृती पुतळा उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. डॉ. बाबासाहेबांचा पूर्ण कृती पुतळा शहराच्या वैभवात भर घालणार आहे. 14 एप्रिल त्यांच्या जयंती दिनाच्या अगोदर हा पुतळा दिमाखात उभारण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मार्केटयार्ड चौकातील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, सामाजिक न्याय विभागाचे सुरेश बनसोडे, राष्ट्रवादी उद्योग व व्यापार सेलचे अनंत गारदे, भिंगार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजय सपकाळ, ओबीसी सेलचे अमित खामकर, परिमल निकम, विद्यार्थी सेलचे वैभव ढाकणे, अर्जुन चव्हाण, अंकुश मोहिते, मारुती पवार, किसन गोयल आदी उपस्थित होते.
पुढे आमदार जगताप म्हणाले की, बाबासाहेबांचा पूर्ण कृती पुतळ्यासाठी एक-एक निर्णय घेऊन, हा पुतळा साकार होण्यासाठी कार्यवाही सुरू आहे. त्यांच्या जयंती दिनी संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून या भव्य दिव्य पुतळ्याचे लोकार्पण सोहळ्यासाठी जयंती उत्सव देखील मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. लवकरच आंबेडकरी अनुयायींचे स्वप्न साकारले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रा. माणिक विधाते म्हणाले की, वैचारिक प्रबोधन व समाज जागृतीसाठी महापुरुषांच्या विचार अंगीकारण्याची गरज आहे. डॉ.बाबासाहेबांचा साकारला जाणारा पूर्ण कृती पुतळा नागरिकांना त्यांच्या विचारांचे अनुयायी होण्यास प्रेरणा देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
