जीवन गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल भालसिंग यांचा सत्कार
अहमदनगर (प्रतिनिधी)- ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक करुन निस्वार्थ भावनेने समाजकार्य सुरु ठेवण्याचे सांगितले. नुकतेच भालसिंग यांना जय असोसिएशन ऑफ एनजीओ (महाराष्ट्र राज्य) संलग्नित जिल्हाभरातील सामाजिक संस्थांच्या वतीने जीवन गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा अण्णा हजारे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी भालसिंग यांनी सामाजिक कार्यासाठी अण्णांकडून आशिर्वाद घेतले.
जय असोसिएशन ऑफ एनजीओ (महाराष्ट्र राज्य) संलग्नित विविध स्वयंसेवी संघटनांच्या शिष्टमंडळाने राळेगण सिध्दी (ता. पारनेर) येथे अण्णा हजारे यांची भेट घेऊन सामाजिक विषयांवर चर्चा केली. यावेळी जय असोसिएशन ऑफ एनजीओचे राज्य अध्यक्ष अॅड. महेश शिंदे, राष्ट्रपती शिक्षक पुरस्कार प्राप्त डॉ. अमोल बागुल, रावसाहेब काळे, डॉ. संतोष गिर्हे आदी उपस्थित होते.
अॅड. महेश शिंदे यांनी सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक व आरोग्य क्षेत्रात विजय भालसिंग गेल्या दोन दशकापासून योगदान देत आहे. कोणत्याही प्रकारचे शासकीय अनुदान व वर्गणी न घेता स्वखर्चातून सेवा करत आहे.
गरजू-निराधार विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, मंदिराचे जीर्णोध्दार, सार्वजनिक परिसर व बारवची स्वच्छता, वारकरी संप्रदायाचे संघटन, वृक्ष रोपण आदी विविध सामाजिक विषयावर सुरु असलेल्या त्यांच्या कार्याची माहिती दिली. विजय भालसिंग यांनी अण्णांच्या विचार व प्रेरणेने सामाजिक कार्य अविरत सुरु राहणार असल्याचे स्पष्ट केले.
