अहमदनगर (प्रतिनिधी)- वाळकी (ता. नगर) येथील पत्रकार ज्ञानदेव गोरे यांची निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ (महाराष्ट्र राज्य) संस्थेच्या राज्य प्रसिद्धी प्रमुखपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा वाळकी ग्रामस्थाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
सामाजिक कार्यकर्ते तथा अखिल विश्व वारकरी परिषदेचे प्रदेश कार्याध्यक्ष विजय भालसिंग यांनी गोरे यांचा सत्कार केला. यावेळी संजय बोठे, युवा उद्योजक भरत बोठे आदी उपस्थित होते .
विजय भालसिंग म्हणाले की, ज्ञानदेव गोरे यांनी नेहमीच विकासात्मक व समाजाच्या हितासाठी पत्रकारिता केली आहे. पर्यावरण संवर्धनासाठी त्यांनी वृक्षरोपण व संवर्धन मोहिमेत दिलेले योगदान आणि जनजागृतीची दखल घेऊन त्यांची झालेली निवड कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. सत्काराला उत्तर देताना ज्ञानदेव गोरे यांनी पर्यावरण संवर्धनाच्या मोहिमेला गती देण्यासाठी कार्य केले जाणार असल्याचे स्पष्ट करुन सर्व ग्रामस्थांना या कार्याला साथ देण्याचे आवाहन केले.