केडगावात बाल वारकर्यांचा टाळ-मृदूंगाच्या निनादात जय हरी विठ्ठल, ज्ञानोबा-तुकोबांचा जयघोष
अहमदनगर (प्रतिनिधी)- जे.एस.एस. गुरुकुलच्या वतीने केडगाव येथे आषाढी एकादशीनिमित्त बाल वारकर्यांच्या दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. माधवनगर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरापासून पायी दिंडी काढण्यात आली. हातात भगवे ध्वज, टाळ-मृदूंगचा निनाद, जय हरी विठ्ठल, ज्ञानोबा-तुकोबांचा जयघोष करीत बाल वारकर्यांनी दिंडी काढली. विठ्ठल, रुक्मिणी व संतांची वेशभूषा केलेल्या बालकांनी सर्वांचे लक्ष वेधले.

विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, साई मंदिर व श्री स्वामी समर्थ मंदिराच्या प्रांगणात बाल वारकर्यांचा रिंगण सोहळा रंगला होता. ज्ञानोबा… तुकाराम… च्या जयघोषाने परिसर निनादला. पांढरी टोपी, कपाळी गंध, पायजमा, बंडी या पोशाखातील लहान मुले, तर रंगीबेरेंगी साड्या परिधान करुन मुली डोक्यावर तुलसी वृंदावन घेऊन दिंडीत सहभागी झाल्या होत्या. हरी ओम भजनी मंडळ आणि शांतीमाई भजनी मंडळ यांच्या वतीने श्री स्वामी समर्थ मंदिराच्या ठिकाणी अभंग, गवळणी सादर केल्या. विद्यार्थ्यांनी दिंडीतून मराठी संस्कृती व वारकरी संप्रदायाचे दर्शन घडविले.
प्राचार्य आनंद कटारिया म्हणाले की, विद्यार्थ्यांमध्ये सर्व धर्माचा आदर व धार्मिक एकोपा निर्माण करण्याच्या उद्देशाने विविध सण-उत्सव शाळेत साजरे केले जातात. शिक्षण व संस्काराने संस्कारक्षम पिढी घडविण्याचे कार्य जे.एस.एस. गुरुकुल करत असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या दिंडीतून पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन घडले. या दिंडीस विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद तर पालकांची देखील साथ लाभल्याचे प्राचार्या निकिता कटारिया म्हणाल्या.

शाहूनगर येथून निघालेली दिंडीचे पाच गोडाऊन रोड, अंबिकानगर, बालाजी कॉलनी मार्गे जे.एस.एस. गुरुकुलच्या प्रांगणात समारोप झाला. यावेळी विद्यार्थ्यांना उपवासाच्या फराळाचे वाटप करण्यात आले. जे.एस.एस. गुरुकुलच्या शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांनी दिंडी यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.