स्क्रीन टाईममुळे विद्यार्थ्यांचे वाढलेले नेत्र विकार कमी करण्याचा उपक्रम
अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील जेएसएस गुरुकुल मध्ये शालेय विद्यार्थ्यांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. मोबाईल, लॅपटॉप व टिव्हीमुळे विद्यार्थ्यांचा स्क्रीन टाईम वाढला असतांना विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करुन वाढत चाललेले नेत्र विकार टाळण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
नेत्र तपासणी शिबिरात प्ले ग्रुप पासून ते इयत्ता आठवी पर्यंतच्या पाचशेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी करण्यात आली. आनंदऋषीजी नेत्रालयाच्या टीमने विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी केली. यावेळी आनंदऋषीजी नेत्रालयाचे प्रशासकीय अधिकारी आनंद छाजेड, जनसंपर्क अधिकारी राजेंद्र गायकवाड, कमल गायकवाड उपस्थित होते.
प्राचार्या निकिता कटारिया यांनी उपस्थितांचे स्वागत करुन कोरोनानंतर विद्यार्थ्यांमध्ये मोबाइल, लॅपटॉप आणि टीव्हीचा वापर अधिक वाढल्याने डोळ्यांच्या तक्रारीही वाढल्या आहेत. स्क्रीनवरील रेडिएशन डोळ्यात पाणी येणे, डोळे खुपणे, लाली येणे, डोळे दुखणे, डोळ्यांवर ताण येणे अशा प्रकारचा त्रास होऊन नजर कमी होण्याचा धोका बळावत आहे. यासाठी वेळीच विद्यार्थ्यांची नेत्रतपासणी करुन नेत्राचे विकार टाळण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

दृष्टीदोष ओळखण्यासाठी व उपचाराकरिता विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात आलेल्या नेत्र तपासणीतून भावी पिढीमध्ये दृष्टी दोष दूर होण्यास मदत होणार असल्याची भावना पालकांनी व्यक्त करुन या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले.
