निर्णयाचा फेरविचार करण्याची अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटनेची मागणी
अहमदनगर (प्रतिनिधी)- विधी मंडळाच्या हिवाळी अधिवेशनात शिक्षक, शिक्षकेतरांना जुनी पेन्शन नाकारणार्या राज्य सरकारचा अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटनेच्या वतीने निषेध नोंदवून याबाबत फेरविचार करण्याची मागणी करण्यात आली. जुनी पेन्शन योजना मिळण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले.
यावेळी जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब शिंदे, सचिव राजेंद्र खेडकर, चांगदेव कडू, उध्दव गुंड, अमोल ठाणगे, संभाजी गाडे, बंडू भांडवलकर, दीपक दरेकर, प्रशांत होन, भाऊसाहेब जिवडे, प्रदीप कोरडे, रमाकांत दरेकर, अवधूत आहेर, बी.एस. बिडवे, सुभाष भागवत, बाळासाहेब मेहेत्रे, अशोक कांंडके, शंकर कटारे आदींसह शिक्षक उपस्थित होते.

फक्त पेन्शनमुळे सरकार दिवाळखोरीत जात असेल, तर हे बाब हास्यास्पद आहे. इतर राज्यात सगळीकडे जुनी पेन्शन योजना दिली जात आहे. महाराष्ट्रात जुनी पेन्शनमुळे दिवाळखोरीची भीती शासनाला का वाटत आहे? पेन्शन हा शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्यांचा हक्क आहे. आज अनेक शिक्षक सेवानिवृत्त झाले आहेत. ते नोकरीला लागताना त्यावेळेस अंशतः अनुदान टप्प्यावर काम करीत होते. मात्र त्यांना शासनाने पेन्शन दिली नसल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात शिक्षकांचे जुनी पेन्शनसाठी आंदोलन सुरु आहे. या आंदोलनास माध्यमिक शिक्षक संघटनेचा पाठिंबा असून, राज्य सरकारने जुन्या पेन्शनबाबत घेतलेल्या निर्णयाचा फेरविचार न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
