सामाजिक भाव ह्रद्यात असावा लागतो -आ. संग्राम जगताप
अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक भाव ह्रद्यात असावा लागतो, निस्वार्थ भावनेने केलेल्या कार्याची समाजही दखल घेतो. फक्त हेतू साधण्यापुरते केलेल्या सामाजिक कार्याचे पितळ उघडे पडते. सामाजिक कार्य एका दिवसात उभे राहत नसून, त्याला अनेक वर्षाची तपश्चर्या व त्यागाची जोड असावी लागते. विजय भालसिंग सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक व आरोग्य क्षेत्रात विजय भालसिंग गेल्या दोन दशकापासून योगदान देत आहे. स्वखर्चाने निस्वार्थ भावनेने सुरु असलेले त्यांचे सामाजिक कार्य दिशादर्शक असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांना जय असोसिएशन ऑफ एनजीओ (महाराष्ट्र राज्य) संलग्नित जिल्हाभरातील सामाजिक संस्थांच्या वतीने जीवन गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार जगताप बोलत होते. याप्रसंगी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, जय असोसिएशन ऑफ एनजीओचे अध्यक्ष अॅड. महेश शिंदे, सह्याद्री छावाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब काळे, उमंग फाउंडेशनचे डॉ. संतोष गिर्हे, अशोक कासार, योगेश खेंडके, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष अभिजीत खोसे, युवक शहर जिल्हाध्यक्ष इंजि. केतन क्षीरसागर, शिवाजी वेताळ, जॉय लोखंडे आदी उपस्थित होते.
अॅड. महेश शिंदे म्हणाले की, कोणत्याही प्रकारचे शासकीय अनुदान व वर्गणी न घेता स्वखर्चातून सेवा करत आहे. गरजू-निराधार विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, मंदिराचे जीर्णोध्दार, सार्वजनिक परिसर व बारवची स्वच्छता, वारकरी संप्रदायाचे संघटन, वृक्ष रोपण आदी विविध सामाजिक उपक्रम राबवित असल्याचे त्यांनी सांगितले. प्रा. माणिक विधाते यांनी समाजाप्रती दातृत्व ठेवणे हीच खरी माणुसकी आहे. माणुसकीच्या भावनेने भालसिंग यांचे कार्य युवकांना दिशा देणारे असल्याचे स्पष्ट केले.