बँकेच्या इतिहासात प्रथमच सेवक संचालकपदी नियुक्तीचा महिलेला मान
अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या सेवक संचालकपदी विद्या तन्वर व श्रीमंत घुले यांची मान्यताप्राप्त युनियनतर्फे नियुक्ती करण्यात आली आहे.
अहमदनगर जिल्हा सहकारी बँक एम्प्लॉईज युनियनच्या वतीने अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळावर सेवक संचालक म्हणून दोन्ही सेवकांच्या नियुक्तीचे पत्र युनियनचे कार्याध्यक्ष धनंजय भंडारे यांनी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे यांना दिले. बँकेचे सेवक संचालक अशोक पवार व सतीश राजेभोसले हे सेवानिवृत्त झाले असल्यामुळे त्यांच्या रिक्त जागी तन्वर व घुले यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

जिल्हा बँकेच्या इतिहासात प्रथमच सेवक संचालकपदी महिला सेवकाची नियुक्ती झाल्याने सर्व महिला कर्मचारींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तन्वर या मुख्य कार्यालयात अधिकारी पदावर कार्यरत असून, घुले शेवगाव शाखेत कार्यरत आहे. या नियुक्तीबद्दल युनियनच्या वतीने कार्यकारी अध्यक्ष भंडारे, सचिव नितीन भंडारी, खजिनदार मुरलीधर कुलकर्णी, सदस्य अशोक पवार आदींनी त्यांचे अभिनंदन केले.